

मुरगूड : बोळावी (ता. कागल) गावाच्या मध्यवस्तीत सुरू असलेला बनावट देशी दारूनिर्मितीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, गावात दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची ग्रामस्थांना जराही कल्पना नव्हती. विशेष म्हणजे, परिसरात एका आलिशान बंगल्याचे बांधकाम सुरू असून, याच बंगल्याच्या तळघरात बनावट देशी दारू तयार करण्याचा उद्योग सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले. मुरगूड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून बनावट दारूनिर्मितीचे साहित्य, स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, स्टिकर्स आणि चारचाकी वाहन असा एकूण २० लाख ३९ हजार २६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. जगदिश आप्पासो केसरकर याच्या घरात बनावट देशी दारू तयार करण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. याप्रकरणी जगदिश केसरकर, अविनाश केसरकर, मारुती माने तसेच रुक्मिणी तोरसे या महिलेसह चौघांना अटक करण्यात आली आहे .
छाप्यामध्ये देशी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. यामध्ये स्पिरीटने भरलेली २२० लिटर क्षमतेची १६ बॅरेल, विविध प्रकारचे इसेन्स, दारूचे बॉक्स, हजारो रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, बनावट लेबल्स, टोपणे तसेच पॅकिंगसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय चारचाकी वाहन, तीन मोबाईल , मोटार आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २० लाख ३९ हजार २६ रुपये आहे. मुरगूडच्या सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनिकेत कुंडले आणि मुरगूड पोलिसांनी ही कारवाई केली.