Illegal Construction Demolition | महायुतीच्या माजी नगरसेवकाचे अनधिकृत बांधकाम हटवले

काँग्रेस नगरसेवकाची तक्रार; कनानगरात कारवाईवेळी प्रचंड तणाव
कोल्हापूर : कनाननगर येथे अनधिकृत बांधकाम हटविताना माजी नगरसेवक दिलीप पोवार यांचे कार्यकते आणि महापालिका अधिकारी यांच्यातील वादामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
कोल्हापूर : कनाननगर येथे अनधिकृत बांधकाम हटविताना माजी नगरसेवक दिलीप पोवार यांचे कार्यकते आणि महापालिका अधिकारी यांच्यातील वादामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. (छाया ः नाज ट्रेनर)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : शहरातील कनाननगर येथे माजी नगरसेवक दिलीप पोवार यांचे अनधिकृत बांधकाम महापालिकेने बुधवारी (दि. २५) हटविले. या कारवाईवेळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिस बंदोबस्तात महापालिकेने ही कारवाई केली. दरम्यान, महापालिका निवडणुकीत पोवार यांनी महायुतीच्या वतीने निवडणूक लढविली होती, तर त्यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात काँग्रेसचे नगरसेवक विशाल चव्हाण यांनी तक्रार केली आहे. त्यानुसार पोवार यांच्यावर महापालिकेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेने पोवार यांना बांधकाम हटविण्याबाबत ११ ऑगस्ट रोजी नोटीस बजावली होती. तरीही त्यांनी अतिक्रमण हटविले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी जेसीबीसह कनाननगर येथे दाखल झाले. त्यांनी कारवाई सुरू करताच पोवार यांचे नातेवाईक घटनास्थळी आले. त्यांनी कारवाई करायची तर सर्वच अनधिकृत बांधकामांवर करावी, अशी भूमिका घेतली; अन्यथा एखादे बांधकाम हटवून कारवाई अर्धवट सोडू नये, असा पवित्रा घेतला. मात्र महापालिका अधिकारी, कर्मचारी पोवार यांचे अतिक्रमण हटविण्यावर ठाम राहिले. त्यामुळे अधिकारी आणि पोवार यांचे नातेवाईक, कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक वादावादी झाली.

घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी ठाण्याचे पोलिस आले. त्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली; परंतु पोवार यांच्या नातेवाईकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेऊ, असे सांगितले. दुपारपर्यंत अनधिकृत बांधकाम काढून घेण्यात आले; परंतु तोपर्यंत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तेथेच थांबून होते.

आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी उपशहर रचनाकार पद्मल पाटील, उपशहर अभियंता निवास पोवार, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, अनुराधा वांडरे, अतिक्रमण अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, उपद्रव शोध पथकाचे जवान तसेच अतिक्रमण, पवडी, नगररचना, उपद्रव शोध पथकाचे जवान व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.