

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
हेरवाड ते अब्दुललाट या मार्गावर गेल्या काही आठवड्यांपासून शासकीय मालकीच्या झाडांची बेकायदेशीर जाळपोळ सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गालगत मोठ्या प्रमाणावर सरकारी झाडे आहेत. अज्ञात व्यक्तींकडून या झाडांना मुद्दामहून आग लावली जात आहे. काही ठिकाणी झाडे पूर्णतः जळून खाक झाली असून, परिसरात धुराचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, स्थानिक जैवविविधतेवर आणि पर्यावरणावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
सार्वजनिक मालमत्तेचे हे थेट नुकसान असून, या प्रकारामुळे वनविभाग आणि महसूल विभागाची भूमिका तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. अद्याप या प्रकरणी कोणतीही ठोस कारवाई झालेली नसून, नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.
पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "शासकीय मालमत्ता म्हणजे सार्वजनिक संपत्ती आहे. तिचे रक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. असा गंभीर प्रकार वारंवार घडत असेल, तर त्यावर तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे," असे मत पर्यावरण प्रेमीतून व्यक्त होत आहे.
या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागांनी संयुक्तपणे चौकशी करून दोषींना उघडकीस आणावे आणि योग्य ती शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी लवकरच तहसीलदार व वनअधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.