

राशिवडे : राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड, मिसाळवाडी परिसरामध्ये राजरोसपणे बॉक्साईटचे उत्खनन सुरू आहे. या बॉक्साईटचे उत्खनन करत कोट्यवधी रुपयांची प्रत्यक्ष लूटच होत असून महसूल विभाग मात्र सोयीची भूमिका घेत दुर्लक्ष करत आहे. चोरट्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेला चेक नाका दुर्बीण घेऊनच शोधावा लागत आहे. या उत्खननाकडे महसुली, खणीकर्म विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
राधानगरी तालुक्यामध्ये गौण खनिज उत्खननास रवानगी नाही; परंतु दुर्गमानवाड, मिसाळवाडी परिसरामध्ये मात्र दिवसा शांत अन् रात्रीच्यावेळी उत्खनन सुरू असते. या ठिकाणचे बॉक्साईट ट्रकमधून कर्नाटकामध्ये नेले जाते. उत्खननाबाबत तक्रार केल्यानंतर जुजबी, कागदोपत्री कारवाई करून दंड आकारणी केल्यानंतर पुन्हा उत्खनन सुरू होते. उत्खननामागे सरकारी यंत्रणेची मोठी साखळीच कार्यरत आहे.
एरव्ही शेतजमीन सुपीक होण्यासाठी स्वतःच्या शेतातील माती काढणार्या शेतकर्यांना मात्र कारवाईची भीती घालणारे मंडल निरीक्षक गप्प का? बॉक्साईटची वाहतूक महसूल अधिकार्यांच्या समोरून होत असताना मात्र सोयीस्कर दुर्लक्ष पर्यावरणाचा र्हास करत आहे. तहसीलदार श्रीमती देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये चुकीच्या पद्धतीने आणि विनापरवाना उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी संबंधित शेतकर्यांवर कारवाई करून त्यांच्या सातबारावर दंड आकारल्याचेही नमूूद केले आहे. ज्या ठिकाणी अवैध उत्खनन होते, त्या ठिकाणी शेतकर्यांवर दंडात्मक कारवाई केली असून दुर्गमानवाड परिसरामध्ये अवैध आणि विनापरवाना असलेल्या उत्खननावर लक्ष ठेवण्यासाठीही चेक पोस्ट व पथक नेमले आहे. दुर्गमानवाड परिसरातील उत्खननावर कारवाई केली काय? यातून एकूण किती रकमेचा दंड आकारला, याचा खुलासा अपेक्षित आहे.
राधानगरी तालुक्यामध्ये गौण खनिजमधून गतवर्षी चार कोटींचे महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट असतानाही सोळा कोटी, तर यंदा पंधरा कोटी उद्दिष्ट असताना मार्च 2024 अखेर अकरा कोटी रुपये महसूल सरकारला मिळाला असल्याची माहिती तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली. असे असले, तरी सरकारने दिलेले उद्दिष्ट पार करण्यासाठी बॉक्साईट चोरीला साथ द्यायची काय, या प्रश्नाचे उत्तर आता जिल्हाधिकार्यांनाच द्यावे लागणार आहे.
अभयारण्य कार्यक्षेत्रातील काही रिसॉर्ट बेकायदेशीर असून या ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय चालतात. या रिसॉर्टला परवानगी दिलीच कुणी? यांना कुणाचे अभय? यामधील काही रिसॉर्टमध्ये जुगार सुरू असल्याचे पोलिस कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.