

गांधीनगर : दोघे मित्र अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापूरहून इचलकरंजीला परत जाताना तावडे हॉटेलजवळ भरधाव ट्रकने मागून मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात अजय संजय बोटे व प्रवीण नागनाथ सोनवणे (वय 22, अटके मळा, इचलकरंजी) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. अजयचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री बारा वाजता घडला.
प्रवीण व अजय मोटारसायकल (एम एच 51 - 2760) वरून इचलकरंजीहून कोल्हापूरला आले होते. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ते उजळाईवाडीला गेले. तिथून ते इचलकरंजीला जात असताना अपघात झाला. दोघा जखमींना उपस्थित लोकांनी रुग्णवाहिकेमधून उपचारसाठी कोल्हापूरला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना अजयचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा नोंद झाला आहे.