

इचलकरंजी : पूर्ववैमनस्यातून सुहास सतीश थोरात (वय 19, रा. भोनेमाळ) या युवकाचे अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह ओढ्यात टाकले प्रकरणातील संशयित ओंकार अमर शिंदे (25) व ओंकार रमेश कुंभार (21, दोघे रा. लिगाडे मळा) या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. पूर्ववैमनस्यातून की आणखी कोणत्या कारणातून हे कृत्य केले, याची माहिती घेण्यात येत आहे. या दोघाही संशयितांना रविवारी चंदूर परिसरात फिरवण्यात आले.
मोटारसायकल दुरुस्तीच्या बहाण्याने सुहास थोरात याला संशयित ओंकार शिंदे, ओंकार कुंभार यांच्यासह आणखी एका अल्पवयीन संशयिताने मोपेडवरून नेले होते. कागल तालुक्यातील अर्जुन गावच्या हद्दीत एका महाविद्यालयाच्या मागील बाजूस त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा मृतदेह ओढ्यात टाकून दिला होता. तातडीने हालचाली करीत तिघाही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अल्पवयीन संशयिताची रवानगी बालसुधारगृहात केली आहे तर उर्वरित दोघे पोलिस कोठडीत आहेत. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच सुहासचा मोबाईलही जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून पोलिसांना एक कोयता मिळून आला आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे संशयितांची कपडे, कोयता तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अधिक तपास उपअधीक्षक विक्रांत गायकवाड करीत आहेत.