

Ichalkaranji Sakal Hindu Samaj Protest: कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर येथे महापुरुषांच्या फलकाची विटंबना झाल्यानंतर उफाळलेल्या वादाचे पडसाद आता इचलकरंजी शहरात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीने इचलकरंजीत भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये आमदार राहुल आवाडे आणि आमदार संग्राम जगताप स्वतः सहभागी होऊन आंदोलकांचे नेतृत्व करणार आहेत.
गेल्या आठवड्यात कोल्हापूरच्या कबनूर परिसरात एका महिलेने महापुरुषांचा फलक फाडून अपमानजनक वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेमुळे शिवप्रेमी आणि हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली होती. संतप्त जमावाने संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर धडक दिली होती. मात्र, त्याच वेळी जमावातील काही तरुणांनी संबंधित महिलेच्या घरावर दगडफेक केली.
पोलिसांनी फलक फाडणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला असला तरी, दगडफेक आणि राडा केल्याप्रकरणी तब्बल ५३ हिंदू तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी चौघांना अटकही करण्यात आली आहे. "विटंबनेचा निषेध करणाऱ्या तरुणांवर अन्यायकारक गुन्हे दाखल झाले असून, ते तात्काळ मागे घेण्यात यावेत," अशी आक्रमक भूमिका सकल हिंदू समाजाने घेतली आहे. या प्रमुख मागणीसाठीच आजचा हा मोर्चा काढण्यात येत आहे.
आजचा हा निषेध मोर्चा इचलकरंजीतील शिवतीर्थ (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा) ते महात्मा गांधी पुतळा असा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी आणि कबनूर परिसरात तणावपूर्ण शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कबनूर गावामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि स्थानिक पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.
आमदार राहुल आवाडे यांनी प्रशासनाकडे या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे. आता या मोर्चाच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.