

संदीप बिडकर
इचलकरंजी : आयपीएल सामन्यांसाठी बेटिंग घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी इचलकरंजीत कारवाई केली. त्याचे धागेदोरे राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचले. परंतु या अनुषंगाने आयपीएल हंगाम संपताना बेटिंग घेत असल्याचे उघडकीस येणे म्हणजे पोलिसांचे अपयश आहे. कारण यावर सातत्याने आवाज उठवला होता. परंतु कारवाई मात्र झाली नाही. महिनाभर चाललेला हा खेळ, सामने संपताना झालेली कारवाई याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
आयपीएलच्या मुंबई-राजस्थान सामन्याच्या रणधुमाळीत चप्पलच्या गोदामात बेटिंगचे रॅकेट सुरू असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह सहा संशयित पोलिस कोठडीत आहेत. त्याचबरोबर इचलकरंजीतील भाजप पक्षाचा एक विद्यमान नगरसेवक सध्या पोलिसांच्या रडारवर आला आहे. त्याचीही चौकशी पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. गेला महिनाभर बेटिंग घेतले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. परंतु पोलिसांच्या कारवाईला दिरंगाई का झाली, याबाबत मात्र शंकेची पाल चुकचुकत आहे. यापाठीमागे मोठे आर्थिक व्यवहार असण्याचा संशय यानिमित्ताने समोर येत आहे.
सामन्यातील प्रत्येक बॉल, चौकार, षटकार, विकेट या सर्वांवर सट्टा लावला जात होता. त्याचबरोबर काही तरुणांना सुरुवातीला बोनस गुण देऊन या खेळामध्ये सामील करून घेतले जात होते. मोबाईलच्या माध्यमातून सुरू असणारा हा सर्व कारभार आयपीएलचे सामने शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर उघडकीस आला. त्यापूर्वी यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याच्या चर्चा नागरिकांत आहेत.
युवावर्ग चक्रव्यूहात
कमी श्रम व कमी वेळेत जास्त पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी शहरातील युवावर्ग मोठ्या प्रमाणात या चक्रव्यूहात सापडल्याचे समोर येत आहे. त्यासाठी काहींनी हातउसने पैसे तसेच काहींनी टक्केवारीने व्याजाने पैसे काढून या खेळात गुंतवले आणि आता ते कंगाल झाले आहेत. तसेच अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे सर्वात जास्त युवावर्गच या चक्रव्यूहात अडकल्याचे दिसून येत आहे.