Ichalkaranji municipal election
Ichalkaranji municipal election | वस्त्रनगरीचा रणसंग्राम विकासकामांपेक्षा हिंदुत्वावरच?Pudhari File Photo

Ichalkaranji municipal election | वस्त्रनगरीचा रणसंग्राम विकासकामांपेक्षा हिंदुत्वावरच?

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर चर्चेचा सूर; घटक पक्षांच्या भूमिकेकडेही लक्ष : पाणी प्रश्नही चर्चेत येण्याची शक्यता
Published on

इचलकरंजी : स्थापनेनंतर इचलकरंजीत महापालिकेची होत असलेली पहिली निवडणूक जिल्ह्यात चर्चेची बनली आहे. महापौरपद आणि पर्यायाने सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. विकासकामांवर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याची कित्येक वर्षांची परंपरा आहे; मात्र ही निवडणूक विकासकामांपेक्षा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौर्‍यानंतर या शक्यतेला बळकटी मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इचलकरंजी दौर्‍यानंतर हा मुद्दा प्रकर्षाने अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचबरोबर इचलकरंजीला गेली दोन दशके भेडसावणार्‍या पाण्याचा प्रश्नही महाविकास आघाडीच्या वतीने ऐरणीवर आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने यापूर्वीच त्या द़ृष्टीने तयारी केली आहे. महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटलेला आहे; मात्र महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. जागावाटपावरून राष्ट्रवादीबाबतचे महायुतीचे घोडे अडले आहे. सन्मानजनक जागा न मिळाल्यास राष्ट्रवादी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेऊ शकते.

स्थानिक विकासकामांच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाते; मात्र सध्या पाणी, रस्ते, स्वच्छता याबरोबरच मूलभूत गरजांचे तीनतेरा वाजले आहेत. वारणा योजना आणि त्यानंतर सुळकूडचा पाणी प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत पाणी प्रश्नाचा मुद्दा विरोधक आक्रमकपणे उपस्थित करण्याची शक्यता आहे. रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यातून होणार्‍या टिकेला उत्तर कसे द्यायचे, हा प्रश्नही सत्ताधार्‍यांसमोर आहे. विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च झाला असला, तरी प्रत्यक्षात विकास कुणाचा झाला, असाही प्रश्न विरोधक विचारत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शंभूतीर्थ लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने हिंदुत्वाचा जागर केल्याचे स्पष्ट झाले आहे. इचलकरंजीच्या राजकीय पटलावर हिंदुत्वाचा झालेला परिणाम लक्षात घेता याही निवडणुकीत हिंदुत्ववाद हाच प्रचाराचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. शहरातील पायाभूत सुविधांचा गंभीर बनलेला प्रश्न सोडवण्यात प्रशासनासह लोकप्रतिनिधी अयशस्वी ठरल्याची टीका सर्वसामान्यांतून सातत्याने केली जात आहे. अशा स्थितीत हिंदुत्वाचे कार्डच प्रभावी ठरणार आहे.

जागावाटपावरच ठरणार महायुतीचे गणित...

राज्यातील काही महापालिकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतही जाण्याबाबत संकेत मिळत आहेत.

इचलकरंजी महापालिकेतही अजित पवार गट स्वतंत्र लढू शकतो. त्यामुळे महायुती मित्रपक्षाला समाधानकारक जागा देणार का, यावरही महायुतीचे गणित ठरणार आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे शिंदे गटालाही अपेक्षित जागा मिळणार का, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रमुख मुद्दे...

हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी : विकासकामांपेक्षा हिंदुत्वाचा मुद्दा प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौर्‍यानंतर चर्चेला उधाण

पाणी प्रश्नावर विरोधक आक्रमक : गेली दोन दशके प्रलंबित असलेला वारणा व सुळकूड पाणी प्रश्न महाविकास आघाडीकडून ऐरणीवर

महायुतीत जागा वाटपाचा तिढा : भाजप-शिंदे गटात तोडगा जवळ; मात्र अजित पवार गटाची भूमिका अस्पष्ट; ‘एकला चलो रे’ची शक्यता

पहिलीच निवडणूक, सत्तेसाठी चुरस : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news