

इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मंगळवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने शहापूर व इचलकरंजी येथे दोन ठिकाणी पोलिस व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार वादावादी व बाचाबाचीचे प्रकार घडले. अंगावर धावून जाण्यापर्यंत परिस्थिती चिघळली होती.
सोमवारी जुनी नगरपालिका इमारतीजवळ वादावादीचा प्रकार घडल्यानंतर मंगळवारीही अशीच स्थिती कायम राहिली. दुपारी 3 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी अखेरच्या क्षणी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील चारही प्रभाग समिती कार्यालयांच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहापूर येथील प्रभाग समिती कार्यालयात दुपारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माजी आ. राजीव आवळे आले. त्यावेळी शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी हे मुख्य प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी उपस्थित होते. आवळे यांच्यासोबत आणखी एक इच्छुक उमेदवार होते. त्यावेळी निवडणूक कार्यालयात आत सोडण्यावरून पोलिस निरीक्षक सूर्यवंशी व माजी आ. आवळे यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली.