Ichalkaranji Water Crisis : इचलकरंजीला ‌‘सुळकूड‌’चेच पाणी

पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; मनपा सभेत अहवाल दबावाखाली केल्याचा आरोप
Ichalkaranji Water Crisis
इचलकरंजी : सभागृहात मंगळवारी पाणी प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
Published on
Updated on

इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील तीव पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिकेत पाणी प्रश्नावर विशेष सभा घेण्यात आली. या सभेत सुळकूड पाणी योजनेतूनच शहराला पाणी आणण्याचा निर्धार सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच या योजनेसाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण उपलब्ध असल्याने भविष्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सुळकूड योजना हाच प्रभावी पर्याय असल्याचा दावा करण्यात आला.

महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही विशेष सभा पार पडली. विरोधी पक्षातील सदस्यांच्या मागणीनुसार महापौर उदय धातुंडे यांनी ही सभा बोलावली होती. सभेत शहरातील अनियमित पाणी पुरवठा, पाणी पुरवठा विभागाच्या कारभारातील ढिसाळपणा आणि अधिकाऱ्यांची उदासीनता यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. तसेच सुळकूड योजना राबवण्याची मागणीही झाली. यावेळी विविध मुद्द्यांवरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाली.

सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी सुळकूड योजना कृती समितीवर गंभीर आरोप केले. संबंधित तांत्रिक अहवाल काही नेत्यांच्या दबावाखाली चुकीच्या पद्धतीने तयार करून मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याचा आरोप त्यांनी केला. या अहवालामुळे शहराच्या पाणीप्रश्नी चुकीचे चित्र निर्माण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

महापौर उदय धातुंडे यांनी सुळकूड योजनेचे पाणी मिळवण्यासाठी व्यापक लढा उभारू. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे सांगितले. तसेच प्रस्तावित धामणी धरणातील 3.84 टीएमसी पाणीसाठ्यातून शहरासाठी पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. उपमहापौर अनिल डाळ्या यांनी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न करू, असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news