

इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या 65 जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी 50 माजी नगरसेवक-नगरसेविका नशीब आजमात आहेत. विशेष म्हणजे, माजी आमदारांसह माजी नगराध्यक्षा, माजी उपनगराध्यक्षांचा यामध्ये समावेश आहे. नवीन सभागृहात जाण्यासाठी माजी नगरसेवकांमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काही प्रभागांत माजी नगरसेवकांनी केवळ खांदेपालट करीत कुटुंबातील सदस्यांना संधी दिली आहे. त्यामुळे नवीन सभागृहातही घराणेशाहीचेच वर्चस्व दिसणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जात होती. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांना नगरसेवक करण्याची संधी यानिमित्त नेत्यांना मिळत होती. त्यामुळे नेत्यांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्ते रात्रीचा दिवस करीत होते; मात्र गेल्या काही वर्षांत राजकारणाची परिभाषाच बदलली आहे. स्थानिक राजकारणात घराणेशाहीचा शिरकाव झाल्याने निष्ठावंतांना संधी मिळणे दुरापास्त बनले आहे. निवडणुकांमध्ये होणारे ‘अर्थ’कारणाचा मुद्दा उपस्थित करून त्यांची कोंडी केली जात आहे. परिणामी, इच्छा असूनही सर्वसामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्ते निवडणुकीपासून चार हात लांब राहत आहेत.
इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आमदार अशोकराव जांभळे रिंगणात उतरले आहेत. भाजपकडून माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, रवी रजपुते, तर शिव-शाहू विकास आघाडीकडून रणजित जाधव, संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे आदी निवडणूक लढवत आहेत. सभागृहात यापूर्वी काम केलेल्या विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक आणि नगरसेविकाही पहिल्या निवडणुकीसाठी नशीब आजमावत आहेत. परिणामी, जवळपास 50 माजी नगरसेवक-नगरसेविका निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर पुन्हा येत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नगरपालिकेच्या सभागृहात निवडून जाणार्या ज्येष्ठ नगरसेवकांनी आपल्या प्रभागातून माघार घेत मुलगी किंवा मुलाला संधी दिली आहे. काही प्रभागात माजी नगरसेविकेचे पती, तर काही ठिकाणी नगरसेवकांनी पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे सुमारे 20 ठिकाणी केवळ खांदेपालट झालेली आहे. त्यामुळे त्या-त्या प्रभागात घराणेशाहीचाच वरचष्मा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये पाच पती-पत्नीची जोडीही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे श्री व सौ यापैकी कोणाची की दोघांचीही सभागृहात एन्ट्री होणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
20 ठिकाणी नातेवाईकांनाच संधी
चार सदस्यीय प्रभाग रचना, आरक्षण आणि सक्षम उमेदवारीसाठी अनेक ठिकाणी माजी नगरसेवक-नगरसेविकांऐवजी त्यांचे कुटुंबातील सदस्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून 12, शिव-शाहू विकास आघाडीकडून 7, तर राष्ट्रवादीकडून 1 ठिकाणी असा 20 ठिकाणी असा प्रयोग करण्यात आलेला आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतरही दोन माजी नगरसेविका आणि एक नगरसेवकाने उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरून नशीब आजमावत आहेत.