

इचलकरंजी : इचलकरंजीत मंगळवारी सकाळी धुळवड खेळताना काही ठिकाणी हुल्लडबाजी झाल्याने शहरात तणावाचे वातावरण होते. पहाटे 6 ते सकाळी 10 पर्यंत रस्त्यावर धुळवड गोळा करण्याच्या निमित्ताने काही मंडळांकडून वाहनांची तोडफोड, परप्रांतीयांना मारहाण तसेच अश्लील शिवीगाळ केल्याच्या घटना घडल्या. दोन एस.टी. बस, चारचाकी वाहने, खासगी बसेस यांना लक्ष्य करून दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. काहीजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
परिणामी सकाळी 10 पर्यंत शहरात ‘अघोषित बंद’ परिस्थिती होती. घटनेनंतर काही नागरिकांनी थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हुल्लडबाज युवकांना ताब्यात घेतले. त्यामुळे दुपारी 12 पर्यंत शहरातील तिन्ही पोलिस ठाण्यांमध्ये संबंधित युवकांच्या पालकांची गर्दी झाली होती. संतप्त नागरिकांनी अल्पवयीनांवरही कारवाईची मागणी केली. काही ठिकाणी पालकांनी नागरिकांची माफी मागून पुन्हा असे कृत्य होणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर पोलिसांनी काहींना समज देऊन सोडून दिले. सकाळच्या वेळेत कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी हुल्लडबाजीच्या भीतीने घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे मुख्य रस्ते ओस पडले होते आणि व्यापार व्यवसायावरही परिणाम झाला.