बाबासो राजमाने
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सभागृहात जाण्यासाठी मैदानात उतरलेल्या इच्छुक बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न शुक्रवारी दिवसभर सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू होते. यामध्ये बहुतांश ठिकाणी यश आले, तर काही ठिकाणी अपयश आल्याचे चित्र उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर स्पष्ट झाले. माघार घेण्यासाठी फ्लॅट, मोटारी ते लाखो रुपये आदी आमिषांसह विनवण्यापर्यंत सारे काही फंडे आजमावत आपल्या समोरील आव्हान कमी करण्याचा प्रयत्न झाला. त्याची शहरात दिवसभर जोरदार चर्चा रंगली होती.
महापालिका निवडणुकीसाठी 445 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी गुरुवारी 22 जणांनी माघार घेतली. शुक्रवारी माघारीचा अंतिम दिवस होता. उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी उफाळून आली होती. तसेच काही घटक पक्ष, आघाड्या व अनेक इतर अपक्षही रिंगणात आहेत. त्यामुळे मतविभाजनाचा फटका बसू नये, यासाठी छाननीनंतर सर्वच पक्षीय उमेदवारांकडून दोन दिवसांपासून मोठ्या हालचाली सुरू होत्या. पक्षाच्या उमेदवारांकडून अपक्षांना थोपवण्यासाठी विविध पक्षांनी वेगळी बहुपातळीवर रणनीती आखल्याचे दिसून येत होते. पक्षातील काहींना थोपवण्यासाठी समन्वय, समजूत आणि काही ठिकाणी कडक संदेश अशा तिन्हीचा वापर केला असल्याची चर्चा होती. बंडखोरांशी संपर्क साधणे, त्यांची कारणे ऐकून घेणे आणि समेट यासाठी प्रयत्न सुरू होते. मनधरणी करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांपर्यंत संपर्क करण्यात येत होता. मनधरणी आणि ‘धन’धरणी करण्याचे प्रयत्नही दिवसभर सुरू होते.
तुमची पक्षनिष्ठा वाया जाणार नाही. भविष्यात त्याची नक्की दखल घेतली जाईल. महापालिकेतील स्वीकृत सदस्य, जिल्हा विभागीय किंवा राज्यस्तरीय शासकीय समितीवर कामाची संधी, पक्ष संघटनेत पदे अशा विविध ऑफर्स देण्यात आल्या. मनधरणी करण्यासाठी शुक्रवारी दिवसभर उमेदवार अपक्षांची भेट घेत होते. काही ठिकाणी पक्षाने संधी दिल्याचे सांगत आपल्याबद्दल रोष ठेवू नये यासह प्रचारात मदत करण्याची विनंती केली जात होती. यासाठी त्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र होते. काहींना अगदी काही मिनिटे माघार घेण्यासाठी उरली असताना धावपळ करीत आणण्यात आले. मनधरणी, इच्छुकांची वाढलेली धाकधूक, नेत्यांचा शब्द मिळाला असला, तरी माघार घेतलेल्यांच्या चेहर्यावर काहीशी नाराजी, तणाव, विभागीय कार्यालयासमोर झालेली गर्दी यासह राजकीय वातावरणही चांगलेच तापले होते.
‘ऑफर’ नाकारली; बिनविरोधचा प्रयत्न अखेर फसलाच...
शहरात यापूर्वी नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना माघार घेऊन बिनविरोध करण्याच्या घटना घडल्या आहेत. या अनुषंगाने राजकीय पक्षांनी यंदा खबरदारी घेतल्याचे दिसून येत होते. त्यातून पाच ठिकाणी बिनविरोधचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी वेगळीच यंत्रणा राबत होती. फ्लॅट, मोटारी यासह लाखोंची बोली सुरू होती; मात्र ती फिस्कटल्याने शहरात बिनविरोधचा प्रयत्न फसला.
फोन ‘नॉट रिचेबल’
सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात अपक्ष म्हणून अनेकजण मैदानात उतरले होते. या नाराजांना रोखण्यासाठी पक्षाचे नेते थेट उमेदवार, त्यांचे नातेवाईक, समर्थक यांच्याकडून उमेदवारांचा शोध घेण्यासाठी तारांबळ उडाली होती; मात्र अनेकांनी चक्क नेत्यांचे फोन ‘ब्लॉक’ला टाकले होते. काहीजण नॉट रिचेबल होते. त्यामुळे अनेक अपक्ष उमेदवार मैदानात उतरले असल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.