Navratri festival | हैदराबादच्या नवरात्रौत्सवाला कोल्हापुरी कलेचा साज

भावपूर्ण डोळे अन् रेखीव रंगकामाची जादू; हैदराबादच्या धूलपेठेत कोल्हापुरी कारागिरांची मोठी मागणी
Navratri festival |
Navratri festival | हैदराबादच्या नवरात्रौत्सवाला कोल्हापुरी कलेचा साज
Published on: 
Updated on: 

सागर मोरे

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या धामधुमीनंतर आता नवरात्रौत्सवाचे वेध लागले असून, तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील ऐतिहासिक ‘धूलपेठ’च्या मूर्ती बाजारात करवीरनगरीच्या कलेचा डंका वाजत आहे. विशेषतः दुर्गेच्या मूर्तींचे जिवंत डोळे रेखाटणे आणि उत्कृष्ट रंगकामासाठी कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातील मूर्तिकार व कारागिरांना मोठी मागणी आहे.

दुर्गामातेच्या मूर्ती घडवताना सर्वात आव्हानात्मक आणि नाजूक टप्पा मानला जातो तो म्हणजे देवीचे डोळे रेखाटणे. कोल्हापूरच्या मूर्तिकारांनी रेखाटलेले डोळे पाहताक्षणी भाविकांना साक्षात देवी समोर उभी असल्याचा प्रत्यय येतो. याच वैशिष्ट्यामुळे हैदराबादमधील स्थानिक कारखानदार शेवटच्या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाच्या डोळे रेखाटण्याच्या कामासाठी कोल्हापूरच्या कारागिरांना विशेष मानधन देऊन पाचारण करतात.

स्प्रे आणि ब्रश फिनिशिंगचा देखणा संगम

केवळ डोळेच नव्हे, तर उत्कृष्ट रंगकामासाठी कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातील मूर्तिकार व कारागिरांना मोठी मागणी राहण्यामागे त्यांचे आधुनिक आणि पारंपरिक रंगकामाचे कौशल्य कारणीभूत आहे. देवीच्या अंगावरील तेजस्वी छटा, नाजूक शेडिंग आणि वस्त्रांवरील उठावदार रंगसंगती साधण्यासाठी कोल्हापूरचे कारागीर स्प्रे फिनिशिंगसोबतच हाताच्या बारीक ब्रश कामाचा अप्रतिम मेळ घालतात. यामुळे मूर्तीला एक वेगळीच चमक आणि उठावदारपणा लाभतो.

नवरात्रासाठी पुन्हा हैदराबादला कूच

हैदराबादचा धूलपेठ परिसर हा दक्षिण भारतातील मूर्तिकलेचे ऐतिहासिक केंद्र मानला जातो. दरवर्षी गणेशोत्सवाच्या दोन महिने आधी कोल्हापूर परिसरातील कसबी कारागीर बाप्पाच्या मूर्ती साकारण्यासाठी हैदराबादमध्ये दाखल होतात. गणेशोत्सवात हे कारागीर काही दिवसांसाठी आपल्या गावी परततात; मात्र लगेचच नवरात्रातील दुर्गा मातेच्या मूर्तींचे काम पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा हैदराबादला रवाना होतात.

परराज्यांत हक्काचे स्थान

गणेशोत्सवापासून नवरात्रौत्सवापर्यंत हैदराबाद, बंगळूर, गोवा आणि उत्तर कर्नाटकातील प्रमुख मूर्ती बाजारांमध्ये कोल्हापूरच्या कारागिरांना विशेष मानधन देऊन पाचारण केले जाते; हीच करवीरच्या समृद्ध कलापरंपरेची खरी पावती ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news