नवलच! करवीरच्या भुयेवाडीत निसर्गाचा चमत्कार; विजेविना बोअरवेलमधून वाहतोय पाण्याचा प्रवाह

बोअरवेलमधून सुमारे अडीच ते तीन इंच वेगाने पाण्याचा प्रवाह आपोआप जमिनीच्या वर येऊ लागलाल आहे
नवलच! करवीरच्या भुयेवाडीत निसर्गाचा चमत्कार; विजेविना बोअरवेलमधून वाहतोय पाण्याचा प्रवाह
Published on
Updated on

नागाव : करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण शामराव पाटील यांच्या शेतात विंधन विहिरीतून (बोअरवेल) कोणत्याही इलेक्ट्रिक मोटारीशिवाय आपोआप पाणी बाहेर येत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. निसर्गाचा हा आगळावेगळा चमत्कार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

शेतकरी पाटील यांनी आपल्या शेतात पाण्याच्या शोधासाठी बोअरवेल मारण्याचा निर्णय घेतला. तब्बल ६०० फूट खोल खोदाई केल्यानंतर अखेर पाण्याचा स्रोत लागला. मात्र, आश्चर्य म्हणजे पाणी लागल्यानंतर मोटार टाकण्याची गरजच उरली नाही. बोअरवेलमधून सुमारे अडीच ते तीन इंच वेगाने पाण्याचा प्रवाह आपोआप जमिनीच्या वर येऊ लागला.

सामान्यतः बोअरवेल मारताना हवेच्या दाबामुळे काही वेळ पाणी वर येते, मात्र भुयेवाडीतील या बोअरवेलमधून सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याचा उपसा सुरूच आहे. कोणत्याही तांत्रिक उपकरणाशिवाय निसर्गदत्त दाबाने वाहणारे हे पाणी पाहून शेतकरी राजा सुखावला आहे.

भूगर्भ शास्त्रानुसार, जेव्हा दोन अभेद्य खडकांच्या थरांमध्ये अडकलेल्या पाण्यावर प्रचंड नैसर्गिक दाब निर्माण होतो, तेव्हा त्याला 'आर्टेशियन वेल' (Artesian Well) म्हटले जाते. अशा स्थितीत विहीर खोदली असता, पाणी पंपाशिवाय भूपृष्ठावर येते या अनोख्या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच भुयेवाडीसह आसपासच्या गावांतील लोकांनी हे 'कौतुक' पाहण्यासाठी शेतावर धाव घेतली आहे. सध्याच्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, निसर्गाची ही किमया लक्ष्मण पाटील यांच्यासाठी आणि परिसरातील शेतीसाठी एक दिलासादायक देणगी ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news