kolhapur Crime | चाकूने पत्नीचा गळा चिरून खून अन् मृतदेहाजवळ बसूनच पोलिसांना फोन

चारित्र्याच्या संशयावरून सुर्वेनगरात फौंड्री कामगाराकडून कृत्य
husband-kills-wife-with-knife-calls-police-sitting-near-body
kolhapur Crime | चाकूने पत्नीचा गळा चिरून खून अन् मृतदेहाजवळ बसूनच पोलिसांना फोनPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : सततचे कर्ज आणि त्यातून निर्माण झालेल्या संशयाच्या भोवर्‍यात एका संसाराचा दुर्दैवी अंत झाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनेच तिचा गळा चिरून निर्घृण खून केला. अस्मिता परशराम पाटील (वय 42) असे पत्नीचे नाव असून, पती परशराम पांडुरंग पाटील (44, रा. महालक्ष्मीनगर, सुर्वेनगर) याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी (दि. 5) मध्यरात्री ही हृदयद्रावक घटना घडली. दरम्यान, पतीने स्वतःच पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. परशराम पाटील हा फौंड्री कामगार आहे.

मंगळवारी रात्री पाटील कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. परशरामचे वडील औषधे घेऊन झोपल्यानंतर, परशराम आणि अस्मिता यांच्यात पैशावरून पुन्हा वाद सुरू झाला. लाखो रुपयांचे कर्ज काढून तू पैसे कुणाला देतेस, या प्रश्नावरून वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात परशरामने बेडरूममध्येच पत्नी अस्मिताचा आधी गळा दाबला आणि नंतर ती मृत झाली नसावी, या भीतीने चाकूने तिचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला तिथेच सोडून त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले.

कर्जाचे दुष्टचक्र आणि कौटुंबिक कलह

पाटील कुटुंब मूळचे राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील आहे. परशराम फौंड्री कामगार म्हणून, तर अस्मिता शिलाई काम करून कुटुंबाचा गाडा हाकत होत्या. काही वर्षांपूर्वी अस्मिता यांनी सुमारे 20 लाखांचे कर्ज काढले होते, जे फेडण्यासाठी त्यांना कळंब्यातील राहते घर विकावे लागले. तेव्हापासून हे कुटुंब सुर्वेनगरात भाड्याच्या घरात राहत होते. घराची विक्री करूनही अस्मिता यांनी मुलगा अलोक (22) आणि पार्थ (20) यांच्या नावावर प्रत्येकी एकेक लाखाचे कर्ज फायनान्स कंपनीतून काढले. मात्र, ही बाब पती परशरामपासून लपवून ठेवली होती. काही दिवसांपूर्वी कर्जाची ही गोष्ट समजताच परशरामचा संताप अनावर झाला. पैशाच्या देवाण-घेवाणीवरून त्यांच्यात सतत खटके उडत होते आणि याच वादाने अखेर मंगळवारी रात्री रौद्र रूप धारण केले.

पोलिसांची कारवाई आणि घटनास्थळावरील चित्र

मध्यरात्री परशरामने स्वतःच पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर करवीर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी घरी परतलेल्या मुलांनी बेडरूमचा दरवाजा ठोठावला; मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. पोलिस आल्यानंतर परशरामने दरवाजा उघडला असता, आतील द़ृश्य पाहून सर्वांनाच हादरा बसला. आईचा मृतदेह पाहून मोठा मुलगा अलोक याला भोवळ आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंचनामा करून चाकू जप्त करण्यात आला. सुमारे तीन वाजेपर्यंत ही सर्व प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक किशोर शिंदे करत आहेत. दरम्यान, पाटील याला न्यायालयात हजर केले असता 5 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news