

पुढारी ऑनलाईन डेस्क : डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी बायकोकडे दागिन्याची मागणी करूनही पत्नी देत नसल्याने राग मनात धरून पतीने दरोड्याचा बनाव रचला व बायकोचा डोक्यात दगड घालून खून केला. पूजा सुशांत गुरव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही धक्कादायक घटना आजरा येथील मडीलगे गावात घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी २४ तासांत उलगडा करत संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात फिर्यादीच संशयित आरोपी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सुशांत सुरेश गुरव असे संशयिताचे नाव असून त्याने दरोड्याचा बनाव रचून त्याने स्वत: च्या बायकोचा खून केल्याची कबुली दिली आहे.
संशयित आरोपी सुशांत गुरव याने बऱ्याच लोकांकडून तसेच बँकेकडून कर्ज घेतले होते. पैशासाठी तगादा लावला जात असल्याने तो अस्वस्थ झाला होता. या कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी त्याने आपल्या बायकोकडे दागिन्यांची मागणी केली. तिने दागिने देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वादावादी झाली. हा राग मनात धरून बायकोचा काटा काढायचे ठरवले. व विचारपूर्वक दरोड्याचा बनाव रचून बायकोचा डोक्यात फावडे व दगड घालून खून केला. त्यानंतर त्याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांना त्याच्यावर संशय वाटल्याने त्याला ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली. यादरम्यान त्याने थातूर-माथूर उत्तरे दिल्याने पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. व त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कर्जामुळे तगादा लावला जात असताना बायकोने दागिने न दिल्याने शांत डोक्याने दरोड्याचा बनाव रचून तिचा खून केल्याची कबूली दिली.