

कोल्हापूर : जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथे कौटुंबिक वादातून कुर्हाडीचे घाव घालून पत्नी दीपाली ( वय 25) मुलगी वैभवी (10) यांचा खून करणार्या अजित सीताराम शिंदे (वय 43) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी मंगळवारी दोषी ठरविले. त्यांच्या शिक्षेवर शुक्रवारी (दि. 9) शिक्कामोर्तब होणार आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हा हादरला होता.
सरकारच्या वतीने प्रधान व जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी काम पाहिले. खटल्यात 16 साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार गाढवे यांच्यासह साक्षीदारांचे जबाब व जिल्हा सरकारी वकील शुक्ल यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. आरोपीने मुलगा प्रेम याच्यावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला होता.
खटल्याची पार्श्वभूमी अशी : अजित शिंदे व्यसनी होता. कामधंदा करीत नव्हता. 6 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी पती-पत्नी यांच्यात वाद झाला. पत्नी दीपालीने नाश्ता लवकर न केल्याने संतापलेल्या अजितने पत्नीवर कुर्हाडीने हल्ला केला. मुलगी वैभवी मैत्रिणीसमवेत खेळायला सतत बाहेर जाते व मुलगा किरकिर करतो, या कारणातून त्यांच्यावरही हल्ला केला. गंभीर जखमी पत्नी व दोन्हीही मुलांना शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र पत्नी दीपाली व मुलगी वैभवी यांचा मृत्यू झाला. अजित शिंदे याच्याविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश तांबे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती.