

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा
देवदर्शन घेवून घरी परतणार्या दाम्पत्यावर इचलकरंजीत काळाने घाला घातला. डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार इचलकरंजी होमगार्ड उपपथकाचे निवृत्त प्रभारी अधिकारी संजय सदाशिव वडींगे (वय 58) व सौ.सुनिता संजय वडींगे (वय 55, रा.रिंगरोड मंगळवार पेठ) या दाम्पत्याचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी पंचगंगा नदी मार्गावरील यशोदा पुलाजवळ हा अपघात घडला. अपघाताची नोंद करण्याचे काम गावभाग पोलिस ठाण्यात सुरू होते.
मंगळवार पेठ परिसरात राहणारे संजय वडींगे व त्यांच्या पत्नी सौ.सुनिता या पंचगंगा नदी तिरावरील वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तिथून ते मोटरसायकलवरून घरी परतत होते. यावेळी बोरगावकडून इचलकरंजीकडे भरधाव येणार्या डंपरखाली त्यांची मोटरसायकल सापडली. यामध्ये सौ.सुनिता यांच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर संजय वडींगे यांच्याही कंबरेवरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने इंदिरा गांधी इस्पितळात नेले यानंतर प्रकृती गंभीर बनल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला.
वडींगे दाम्पत्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत होती. या अपघातामुळे नदी मार्गावरील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम गावभाग पोलिस ठाण्यात सुरू होते.