कोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटन विश्वातला महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित इव्हेंट ठरलेल्या दै. ‘पुढारी’ आयोजित पर्यटन प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी रविवारी पर्यटकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सुट्टीचा दिवस साधत पर्यटनाची आवड असणाऱ्या कोल्हापूरकरांनी राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवनात अलोट गर्दी केली होती. आगामी काळात होणाऱ्या सहलींचे ‘ऑन द स्पॉट’ ॲडव्हान्स बुकिंग करत पर्यटकांनी विशेष सवलतींचा लाभ उठवला.
गगन टूर्स प्रस्तुत ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२६’ पॉवर्ड बाय अ हेवन हॉलिडेमध्ये पर्यटकांना त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार टूर्सचे असंख्य पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत. कौटुंबिक सहली, हनिमून पॅकेजेस आणि सोलो ट्रिप्ससाठी पर्यटकांची स्टॉल्सवर माहिती घेण्यासाठी आणि बुकिंगसाठी एकच घाई दिसून आली. देशांतर्गत काश्मीर, हिमाचल, केरळम, राजस्थान यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांसह युरोप, स्वित्झर्लंड, बँकॉक-पट्टाया व्हिएतनाम, जपान, चीन, न्युझिलंड आणि दुबई यांसारख्या आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन्सची परिपूर्ण माहिती येथे अनुभवी पर्यटन व्यावसायिकांकडून मिळत आहे. बजेटनुसार सहल कस्टमाईज करून मिळण्याची सोय आणि आकर्षक ‘अर्ली बर्ड’ डिस्काऊंटस्मुळे ग्राहकांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
दरम्यान, पर्यटनप्रेमींसाठी माहिती आणि ऑफर्सचा खजिना ठरलेल्या या प्रदर्शनाचा सोमवारी (दि. ३) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्यांना अजून भेट देता आलेली नाही, अशा पर्यटकांनी आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील सहलीचे बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.