

कोल्हापूर : राज्यातील परिवहन विभागाच्या फतव्याने राज्यात सक्ती असणारी ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ बसविण्यास 30 नोव्हेंबर रोजी मुदत होती. राज्य सरकारने यामध्ये बदल करून 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जिल्ह्यात अद्याप तब्बल तीन लाख 68 हजार 976 वाहनांचे अजूनही साधे बुकिंगही झाले नाही. जिल्ह्यातील नऊ लाखांपैकी केवळ 4 लाख 3 हजार 381 वाहनांना नंबरप्लेट बसविल्या आहेत. राज्यातील 2019 पूर्वी नोंद असणार्या वाहनांना या नंबर प्लेटची सक्ती करण्यात आली आहे. या नंबर प्लेट बसविण्यासाठी शासनाने दोन ते तीनवेळा मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील 5 लाख 41 हजार 368 वाहन मालकांनी या नंबर प्लेटसाठी बुकिंग केले होते. यापैकी 4 लाख 3 हजार 815 वाहनांना या नंबर प्लेट बसविल्या आहे. बुकिंग करूनही अद्याप सुमारे 1 लाख 37 हजार 566 वाहने नंबर प्लेटच्या प्रतीक्षेत आहेत.
बुकिंग केल्यावर नंबर प्लेट 90 दिवसांत लावली नसल्यास वाहनधारकाने भरलेले पैसे बुडणार आहेत. ही नंबर प्लेट न बसविल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. शिवाय अशी नंबर प्लेट न बसविल्यास संबंधित वाहनांचे आरटीओतील रिपासिंग, कर्जाचा बोजा चढविणे, कमी करणे आदींसह कोणतेच काम होणार नाही. त्यामुळे या नंबर प्लेट बसविणे वाहनधारकांना बंधनकारक झाले आहे. या नंबर प्लेटसाठी प्रतीक्षेतील वाहनांची संख्या पाहून राज्य सरकारने आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.