

कोल्हापूर : सुनील सकटे
केशवराव भोसले नाट्यगृहास लागलेल्या आगीबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. शासकीय यंत्रणांनी आपल्या परीने अपघात नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा अपघात नव्हता तर मग आग लागली कशी ? असा संतप्त सवाल शहरवासीयांतून केला जात आहे. या प्रश्नांचे उत्तर आता चौकशी समितीच्या अहवालातून बाहेर येणार का, अशी विचारणा होत आहे. (Keshavrao Bhosale theater)
सर्वसाधारणपणे एखाद्या इमारतीस अथवा वास्तूस आग लागताच पहिला संशय महावितरण कंपनीवर येतो. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्रथम अंदाज बांधून आगीचे विश्लेषण केले जाते. दुसरे कारण त्या इमारतीतील विद्युत यंत्रणा सुस्थितीत आहेत.
मात्र त्या सुस्थितीत नसल्याचा कांगावा केला जातो. या दोन्ही शक्यता फेटाळल्या तर मग आग लागली कशी हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. केशवराव भोसले नाट्यगृहात गुरुवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण नाट्यगृह खाक झाले. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण करून होत्याचे नव्हते केले.
या आगीबाबत महावितरण कंपनीने तत्काळ प्रतिक्रिया देऊन शॉर्ट सर्किटने आग लागली नसल्याचे स्पष्टीकरण दिले. यामध्ये विद्युत खांबापासून मीटरपर्यंत सर्व यंत्रणा सुरळीत असल्याचे स्पष्ट केले. राहिला प्रश्न मीटरपासून संपूर्ण नाट्यगृहातील विद्युत यंत्रणेचा. तो मात्र महापालिकेच्या अखत्यारीत आहे.
शनिवारी महापालिकेनेही ही आग विद्युत यंत्रणेमुळे लागली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या नाट्यगृहाचा फायर ऑडिट रिपोर्टच जनतेसाठी खुला केला आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक नियमानुसार नाट्यगृहातील अग्निशमन सुविधा सुस्थितीत असल्याबाबत शासनाने नियुक्त केलेल्या लायसन होल्डरकडून महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे फायर ऑडिट व अग्निशमन उपकरणे सुस्थितीत असल्याबाबत दि. १४ जून २०२४ रोजी बी फॉर्म (फायर ऑडिट रिपोर्ट) सादर केला आहे.
या ऑडिट रिपोर्टची मुदत एक वर्षासाठी आहे. महापालिका आणि महावितरण या दोन्ही संस्थांच्या अहवालावरून शॉर्ट सर्किटचा मुद्दा आता बाजूला पडला आहे. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेण्याची गरज आहे.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक नियमानुसार नाट्यगृहातील अग्निशमन सुविधा सुस्थितीत असल्याबाबत शासनाने नियुक्त केलेल्या लायसन होल्डरकडून महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे फायर ऑडिट व अग्निशमन उपकरणे सुस्थितीत असल्याबाबत दि. १४ जून २०२४ रोजी बी फॉर्म (फायर ऑडिट रिपोर्ट) सादर केला आहे.
या ऑडिट रिपोर्टची मुदत एक वर्षासाठी आहे. महापालिका आणि महावितरण या दोन्ही संस्थांच्या अहवालावरून शॉर्ट सर्किटचा मुद्दा आता बाजूला पडला आहे. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेण्याची गरज आहे.
आगीच्या मुळाशी जाण्याची गरज
केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग कलाकारांसह शहरवासीयांना वेदनादायी आहे. चौकशी समिती नेमली आहे. अहवालानुसार महापालिका महावितरणला क्लीन चिट मिळाली आहे. यामुळे या आगीचे कारण शोधण्यासाठी चौकशी समितीने मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे.