

राधानगरी : कुठल्याही कर्जाशिवाय आबिटकरांनी गुवाहाटीवरून आल्यानंतर केवळ 2 वर्षांत स्वतःची खासगी 127 कोटी रुपयांची नॉलेज सिटी कशी उभारली? ही तर गद्दारीचे गुवाहाटीचे 50 खोके आणि वारेमाप कमिशनची करामत असल्याचा हल्लाबोल माजी आमदार के. पी. पाटील यांनी केला. म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथे झालेल्या जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, तुमचे सर्व कारनामे जनतेला माहीत झाले आहेत, तरीही मी तुम्हाला विचारतो, तुमच्या खासगी नॉलेज सिटीसाठी भुदरगड तालुक्यातील पाल येथे 2 वर्षांपूर्वी घेतलेल्या जमिनीचा दर काय होता? कोणतेही कर्ज न घेता तब्बल 97 एकर जमीन तुम्ही कुठल्या पैशाच्या माध्यमातून खरेदी केली? केवळ दोन वर्षांत शासनाकडून कसल्याही प्रकारचे अर्थसाहाय्य न घेता एवढ्या मोठ्या रकमेची खासगी नॉलेज सिटी उभारणे तुम्हाला विना भ्रष्टाचार शक्य होते काय? मग तुम्ही दहा कॉलेज कर्ज न घेता कुठल्या पैशाच्या जोरावर काढली?
तुम्ही ही नॉलेज सिटी गद्दारीच्या बदल्यात सुरत व गुवाहाटीमधून मिळालेले खोके आणि विकासकामांच्या भ्रष्टाचारी कमिशनमधून उभी केली, हे जनता जाणून असल्याने याचे उत्तर तुम्हाला मतपेटीतून मिळेल.प्रा. किसन चौगले म्हणाले, आबिटकरांचे प्रेम जनतेवर नसून केवळ पैशांवर आहे. या निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ आहे. राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी धैर्यशील पाटील-कौलवकर, संजयसिंह पाटील, ए. डी. चौगले यांची भाषणे झाली. प्रचार सभेपूर्वी दिवसभरात भित्तमवाडी, गवशी, कोतोली, गावठाण, कोते, गोतेवाडी, खामकरवाडी, पखालेवाडी, मानेवाडी, पाल बुद्रुक, पालखुर्द, चांदे, लाडवाडी, केळोशी, सुतारवाडी आदी गावांचा संपर्क दौरा झाला. यावेळी पी. डी. धुंदरे, सदाशिवराव चरापले, सचिन घोरपडे, सर्जेराव पाटील, प्रसाद पिल्लारे, विलास निकम, अस्लम मुल्लाणी, कृष्णात बरकाळे, दादू पाटील, संजय ठाकरे, संजय कांबळे, अशोक पाटील आदी उपस्थित होते.
अनेक विकासकामांना मंजुरी नाही, जे काम केले त्याला दर्जा नाही, निकृष्ट विकासकामांतून केवळ कमिशन उकळणे आणि जमीन घेणे एवढा सपाटा लावणार्या या गद्दार आणि भ्रष्टाचारी भस्मासुराला या निवडणुकीत पराभूत करून राधानगरी मतदारसंघ त्यांच्यापासून वाचवूया, असे के. पी. पाटील म्हणताच जनसमुदायातून शिट्ट्या आणि टाळ्यांचा एकच आवाज घुमला.