

गुडाळ, पुढारी वृत्तसेवा : वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे गुडाळ (ता. राधानगरी) येथील मधली गल्ली (माणटेक) परिसरात राहणाऱ्या बळी पांडुरंग पाटील यांच्या राहत्या घराची भिंत गुरुवारी (दि. २५) सकाळी सात वाजता कोसळल्याने सुमारे ५० हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, दहा दिवसांपूर्वी या भिंती शेजारील जनावरांचा गोठा अतिवृष्टीमुळे जमीनदोस्त झाला होता. त्यामुळे आता घराची भिंतही पावसाळ्यात पडणार या धास्तीमुळे कुटुंबप्रमुख पांडुरंग कृष्णा पाटील हे आजारी पडले. आणि २२ जुलैरोजी त्यांचे निधन झाले. आज सकाळी घराची मोठी भिंत स्वयंपाक घर आणि मधल्या सोप्यात कोसळली . कै पांडुरंग पाटील यांचे सुपुत्र बळी हे आपल्या पत्नी आणि मुलासह बाहेरच्या सोप्यात असल्याने जीवित हानी टळली. मात्र, संसार उपयोगी साहित्य, धान्य यांचे मोठे नुकसान झाले.
गाव कामगार तलाठी पी. आय. गुरव, कोतवाल कुमार कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेचा पंचनामा केला.