

कोल्हापूर : शहरातील अत्यंत दाटीवाटीने असलेल्या शाहूनगर येथे एका घराला आग लागली. त्यातच घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. कानठळ्या बसवणारा स्फोटाचा आवाज आणि आगीच्या प्रचंड ज्वाळांनी शाहूनगरात भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, घरात कुणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. मंगळवारी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. यात सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले.
शाहूनगरातील नवश्या मारुती मंदिराजवळ रशीद मकतूम सय्यद यांचे घर आहे. पत्नी रेश्मा यांच्यासह ते लाईन बाजार येथील झूम बायोगॅस प्रकल्पात काम करतात. सय्यद हे पत्नीसह सकाळी 9 वाजता कामावर गेले. घराला कुलूप लावून 10.40 वाजता त्यांचा मुलगा रमजान याला नातेवाईक शाळेत सोडायला गेलेे. ते घरातून बाहेर पडताच अवघ्या पाच मिनिटांत घरातून धूर येऊ लागला.
सय्यद यांची बहीण जैबून नदाफ या समोरच राहतात. त्यांनी तत्काळ आपल्या मुलाला सांगितले. मुलगा दस्तगीर नदाफ यांनी घराचा दरवाजा तोडला. परंतु, तोपर्यंत आग भडकली आणि सर्वत्र पसरली. त्यामुळे ते पळत बाहेर आले. त्याच क्षणी घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आग आणखी भडकली. स्फोटाचा प्रचड मोठा आवाज आणि आगीच्या ज्वाळा, यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली.
आग आटोक्यात आणताना अनंत अडचणी
दाट वस्ती, एकमेकांना चिकटून असलेली घरे आणि अरुंद गल्ल्या, यामुळे आग आणखी धोकादायक ठरण्याची शक्यता होती. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची वर्दी दिली. अग्निशमन दलाचे तीन बंब, दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. सय्यद यांचे घर आतील बाजूस असल्याने अग्निशमन बंब त्या ठिकाणापर्यंत पोहोचत नव्हता. मोठ्या पाईपद्वारे आणि इतर घरांच्या पत्र्यावर चढून जवानांनी आग आटोक्यात आणली.
अनंत अडचणींचा सामना करत सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. मुख्य अग्निशमन दल अधिकारी मनीष रणभिसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन मास्तर जयवंत खोत व विजय सुतार, जवान उमेश जगताप, अशोक साठे, सनी पाटील, फायरमन अनिल बागुल, विशाल चव्हाण, संग्राम मोरे, प्रवीण ब्रह्मदंडे, नितेश शिंगारे, आशिष माळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्थानिक नागरिकांनीही जवानांना मोलाची मदत केली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.