नववर्ष स्वागतासाठी हॉटेल, रिसॉर्ट, परमिट रूम पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार

देशी-विदेशी दारू दुकानांना रात्री 1 पर्यंत विक्रीची मुभा; बगीचे रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार, डीजेच्या तालावर तरुणाई करणार जल्लोष
New Year celebration
नववर्ष स्वागतासाठी हॉटेल, रिसॉर्ट, परमिट रूम पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार आहेत.
Published on
Updated on

कोल्हापूर : संगीताच्या तालावर ठेका धरत फटाक्यांच्या आतषबाजीने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या जल्लोषी स्वागतासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे. शहर व परिसरातील हॉटेल, रिसॉर्टस्मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील अनेक इमारतींना विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. 31 डिसेंबरनिमित्त देशी व विदेशी मद्याची दुकाने रात्री 1 वाजेपर्यंत, तर परमिट रूम पहाटे पाचपर्यंत खुले राहणार आहेत. महापालिकेचे बगीचेही रात्री बारा वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर व परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वन विभागाच्या वतीने 28 डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधी वनक्षेत्रात 31 डिसेंबरची पार्टी तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. शहरातील विविध हॉटेल्समध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच खवय्यांसाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणाचे खास पॅकेज तयार करण्यात आले आहेत. डीजेच्या तालावर ठेका धरण्यासाठी पुणे, मुंबईबरोबरच गोवा येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील महापालिकेचे बगीचे रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. काही बगीचे विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहेत. या ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

ग्रामीण भागातील फार्म हाऊस, रिसॉर्ट फुल्ल

ग्रामीण भागात अ‍ॅग्रो टुरिझम अंतर्गत विविध सुविधांनी सज्ज अशी रिसॉर्ट उभारण्यात आली आहेत. येथे स्वीमिंग पूलभोवती जेवण तसेच नृत्याच्या खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही रिसॉर्टवर अधिकृत सांगीतिक कार्यक्रम होणार आहेत. शाहूवाडी, राधानगरी, आंबा, गगनबावडा, पन्हाळा परिसरातील रिसॉर्टला विशेष मागणी आहे. त्याचसोबत अनेकांनी फार्म हाऊसचे बुकिंगही केले आहे.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील प्रमुख मार्ग तसेच चौकांमध्ये पोलिसांकडून वाहनांची तपासणी तसेच दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. शहरात अनेक तरुण मंडळे व संस्थांनी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. नववर्षानिमीत्त कोल्हापूर वॉकर्स ग्रुपतर्फे आरोग्यासाठी रंकाळा तलावाला पाच प्रदक्षिणा उपक्रम राबवण्यात येणार आहे. दरम्यान वन विभागाच्या वतीने 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत वनक्षेत्रात पार्टी तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत वन क्षेत्रात प्रवेशास मज्जाव असून गस्त घालण्यात येणार आहे.

मद्यप्राशन परवान्यासाठी गर्दी

मद्यप्राशनाचा परवाना काढून घेण्यासाठी सोमवारी दिवसभर गर्दी दिसून आली. अनेकांनी एका दिवसाचा परवाना काढून घेतला. 31 डिसेंबरच्या रात्री भागाभागात पोलिसांची नाकाबंदी असते. पोलिस दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करतात. विविध गुन्हेही दाखल करतात. त्यामुळे मद्यप्राशनाचा परवाना काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.

तीन लाख ग्राहकांनी घेतला दारू पिण्याचा परवाना

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने दारू पिण्यासाठी परवाने विक्री सुरू केली आहे. सोमवारअखेर जिल्ह्यात सुमारे तीन लाख परवाने विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशी दारूच्या परवान्याचे शुल्क दोन रुपये तर विदेशीच्या परवान्याचे शुल्क पाच रुपये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news