

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना केशव वैद्य या नावाने आज (शुक्रवार) दुपारी पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. इंद्रजीत सावंत यांना त्यांच्या घरात घुसून त्यांचा खात्मा करण्यात येईल, असेही म्हटले आहे. केशव वैद्य यांच्या कमेंट बॉक्समध्ये धमकीचा उल्लेख करण्यात आला आहे. (Indrajit Sawant threat)
नागपूर येथील प्रशांत कोरटकर याने चार दिवसापूर्वी इंद्रजीत सावंत यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणावरून महाराष्ट्रात गदारोळ माजलेला असतानाच आणि संशयित कोरटकर यांच्या शोधासाठी राज्यातील पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असताना आज (शुक्रवार) दुपारी पुन्हा इंद्रजीत सावंत यांना केशव वैद्य या नावाने धमकाविण्यात आले आहे.
फार काही दिवस नाही....पण लवकरच घरात घुसून इंद्रजीत सावंत यांचा खात्मा केला जाईल.... असे त्यात म्हटले आहे. या धमकीमुळे कोल्हापूरसह परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. इंद्रजीत सावंत यांनी दुपारी वकिलांची भेट घेतली असून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले.