

कोल्हापूर : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कर्नाटकने हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद करून धरणात अनावश्यक पाणीसाठा केल्यामुळे कृष्णा, पंचगंगा -वारणा या प्रमुख नद्यांचे प्रवाह मागील दोन-तीन दिवसांपासून मंदावल्याचे दिसत आहेत. परिणामी प्रमुख नद्यांच्या पाण्याचा फुगवठा वाढून पाणी तुंबून आजुबाजूच्या शेत-शिवारात पसरू लागले आहे. ही सगळी संभाव्य महापुराची लक्षणे समजण्यात येत आहेत.
धरणाची तळपातळी 512 मीटर असून साठवण क्षमता केवळ 6 टीएमसी आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या 2-3 दिवसांत धरण पूर्ण भरून घेणे सहज शक्य आहे. पण कर्नाटक जलसंपदा विभागाचे अधिकारी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच गरज नसताना पाणी साठवायला सुरुवात करतात.
याबाबत महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी आणि महापूर नियंत्रण कृती समितीने अनेकवेळा कर्नाटककडे तक्रारी केल्या आहेत. यंदाही अशा तक्रारी झाल्यानंतर कर्नाटकने चार दिवसांपूर्वी या धरणाचे सर्व दरवाजे खुले केले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी कर्नाटकने पुन्हा 22 दरवाजांपैकी केवळ 4 दरवाजे खुले सोडून बाकीचे 18 दरवाजे बंद केले आहेत. परिणामी, या धरणात आताच 521 मीटरपर्यंत पाणीसाठा झालेला आहे. हिप्परगी धरणातून पाणी वेगाने पुढे न सरकता तुंबून राहत असल्यामुळे कृष्णा, वारणा आणि पंचगंगा या तिन्ही नद्यांच्या प्रवाहावर त्याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे.
गेल्या 8-10 दिवसांपासून या तिन्ही नद्यांचे पाणी वेगाने वाढू लागले आहे. पण त्यांच्या प्रवाहाला वेग असल्यामुळे पाणी वेगाने पुढे सरकत होते. त्यामुळे एकाही नदीचे पाणी पात्राबाहेर पडू शकलेले नव्हते. पण कर्नाटकने हिप्परगी धरणातील पाणीसाठा वाढवून 18 दरवाजे बंद केल्यापासून धरणातील बॅकवाटर हळूहळू महाराष्ट्राच्या राजापूर बंधार्याकडे सरकत आहे. नृसिंहवाडीपासून पुढे तर कृष्णा नदीचा प्रवाह जसा काही स्तब्ध झाल्यासारखा दिसत आहे. परिणामी कृष्णेला येऊन मिळणार्या वारणा आणि पंचगंगा या दोन नद्यांचे प्रवाहही हळूहळू थबकून आजुबाजूच्या शेत-शिवारात पसरताना दिसत आहे. याचा पहिला प्रत्यय शिरोळ तालुक्यात येत आहे.
हिप्परगी धरणाच्या खालच्या बाजूचे अलमट्टी धरण सध्या निम्म्याहून अधिक भरले आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासह सर्वच नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात बर्यापैकी पाऊस सुरू आहे. नजिकच्या काळात पावसाचे प्रमाण आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत अलमट्टी धरणही भरून त्याचे आणि हिप्परगीचे बॅकवॉटर पुन्हा एकदा महापुराला निमंत्रण देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच या दोन धरणांच्या पाणीसाठ्यावर योग्य नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. हिप्परगीचे सर्व दरवाजे खुले करून ऑगस्टअखेरपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी 517 मीटरच्या खाली ठेवण्याची गरज आहे.