

कुरुंदवाड : कृष्णा नदीवरील कर्नाटक राज्यातील हिप्परगी धरणाचा एक दरवाजा पाण्याच्या तीव— दाबामुळे अचानक तुटल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग अलमट्टी धरणाच्या दिशेने सुरू झाला असून, त्याचे थेट परिणाम महाराष्ट्रातील कृष्णा नदीवरील जलव्यवस्थेवर जाणवत आहेत. या अनियंत्रित विसर्गामुळे महाराष्ट्रातील राजापूर बंधार्याजवळील पाण्याची पातळी अवघ्या काही तासांत चार ते पाच फुटांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिप्परगी धरणातून आतापर्यंत एक टीएमसीपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी राजापूर बंधार्याजवळ सुमारे चौदा फूट पाणीपातळी नोंदवली गेली होती. मात्र, या घटनेनंतर पाणीपातळीत सातत्याने घट होत असल्याने सिंचनासाठी उपलब्ध असलेला पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची तरतूद तसेच नदीकाठावरील शेतीवर याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हिप्परगी धरणाच्या तुटलेल्या दरवाज्याच्या दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाबाबत कर्नाटक धरण प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत असून, धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू राहण्याची शक्यता असून, या कालावधीत आणखी पाण्याचा विसर्ग होणार असल्याने राजापूर बंधार्याजवळील पाण्याची पातळी आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पाटबंधारे विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, राजापूर बंधार्यावर तत्काळ बरगे टाकून पाणी अडवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. राजापूर बंधार्याचे निरीक्षक पुजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती देणे टाळले. अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.