कोल्हापूर : विशाळगडवरील बेकायदेशीर अतिक्रमण काढावे, पावसाळ्यात काढण्याला बंदी घतलेली अतिक्रमणे तत्काळ काढावीत, या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतल्यानंतर शासनाने अनेक बेकायदेशीर अतिक्रमणावर हातोडा चालवला. पण, यातील काही लोक न्यायालयात गेले. न्यायालयाने पावसाळ्यात कोणतेही अतिक्रमण काढू नका, असे स्पष्ट आदेश दिले. आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे विशाळगडावरील अतिक्रमण मोहीम सुरू करावी, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली. तसेच तेथे बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांचे स्मारक उभा करावे, विशाळगड अतिक्रमणमुक्त होईपर्यंत तो पर्यटकांसाठी खुला करू नये. उच्च न्यायालयात प्रशासनाची बाजू भक्कम मांडण्यासाठी शासनाकडून ज्येष्ठ अधिवक्त्याची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संदेश देशपांडे, दीपक देसाई, राजू जाधव, चंद्रकांत बराले, प्रकाश चव्हाण, गजानन तोडकर, मनोज साळुंखे, अवधूत जाधव, अनिरुध्द कुंभार व हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.