

जयसिंगपूर : येथील शाहूनगर परिसरात शनिवारी सकाळी अचानक हाय व्होल्टेज विजेचा पुरवठा झाल्याने 50 हून अधिक घरांमधील महागडी विद्युत उपकरणे जळून खाक झाली. या घटनेत नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत माजी उपनगराध्यक्ष शैलेश आडके यांनी महावितरणकडे तक्रार करून तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास शाहूनगरमधील घरांमध्ये अचानक विजेचा दाब वाढला. काही कळण्याच्या आतच घरातील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, पंखे आणि दिवे यांसारखी उपकरणे बंद पडली. अनेक घरांतील बंद असलेली उपकरणेही जळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या अनपेक्षित प्रकाराने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाहणी केली.
दरम्यान, मागील आठवड्यातही सुदर्शन चौक परिसरात अशाच प्रकारची घटना घडली होती. आता पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. महावितरणने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि या समस्येवर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.