

धीरज बरगे
कोल्हापूर : घरी काम असल्याने रौनकला त्याच्या आईने सोमवारी घराबाहेर पडण्यापासून रोखले. तीन वेळा आईने त्याला गावी जाऊ नकोस, असे सांगितले. पण रौनक आदमापुरात देवदर्शन करून मूळ गावी पुंगावला (ता. राधानगरी) जाण्यासाठी घराबाहेर पडलाच. कळंबा येथे मित्राला घेऊन देवदर्शनाला जात असताना कळंबा तलाव परिसरात त्याच्या भरधाव दुचाकीचा अपघात झाला.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रौनकवर दोन दिवस सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. आई जाऊ नको म्हणत असताना रौनक गावी जाण्यासाठी निघाला तो घरी परतलाच नाही. ऐन उमेदीत रौनकला मृत्यूने गाठल्याने पुंगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुंगावात दीपक बरगे कुटुंबासमवेत राहतात. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी पन्हाळा येथे हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे ते पुंगाव येथून सहकुटुंब पन्हाळा येथेच राहायला आले आहेत. मोठा मुलगा यश अलीकडेच रेल्वेमध्ये नोकरीला लागला आहे. त्यामुळे लहान मुलगा रौनक व पत्नीसमवेत ते पन्हाळा येथेच राहत होते. रौनक गोखले महाविद्यालयात शिक्षण घेत होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून व्यवसायात नाव कमवायचे हे रौनकचे स्वप्न होते. पण, त्याच्या अकाली मृत्यूमुळे त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहिले.
पन्हाळा येथे राहायला गेलेला रौनक आठवड्यातून एकदिवस मूळ गावी पुंगावला जायचा. वर्षभरापूर्वीच घरच्यांनी त्याला नवीन मोपेड घेऊन दिली होती. मोपेडवरून तो पन्हाळा ते पुंगाव अशी आठवड्यातून एक फेरी करायचाच. सोमवारीही तो गावी जाण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने घरी काम जास्त असल्याने आई त्याला आज गावी जाऊ नकोस, असे सांगत होती. मात्र, रौनक सकाळी गावी जाण्यासाठी पन्हाळा येथून मोपेडवरून बाहेर पडला. कळंबा येथे एका मित्राला घेऊन तो आदमापूरला देवदर्शन करून मग गावी जाण्यासाठी निघाला. कळंबा तलाव येथून पुढे गेल्यावर काही अंतरावर त्याचे भरधाव मोपेडवरील नियंत्रण सुटले आणि येथील एका हॉटेलच्या बोर्डला त्याची जोरदार धडक बसली. धडकेत रौनक गंभीर जखमी झाला. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून सीपीआरमध्ये दाखल केले. दोन दिवस मृत्यूसोबत झुंज सुरू होती. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
...तर तो आज सुखरुप असता
अवघा 19 वर्षीय रौनकच्या अपघाती मृत्यूने त्याच्या घरच्यांना धक्का बसला आहे. आईचे सांगणे जर रौनकने ऐकले असते तर तो आज सुखरूप असता, अशी चर्चा सीपीआरमध्ये आलेले नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये सुरू होती.