

वाशी/कोल्हापूर : करवीर तालुक्यातील वाशी येथील ‘सनराईज लॉज’वर पोलिसांनी छापा टाकून व्हॉटस्ॲप ग्रुपद्वारे चालवणाऱ्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा भांडाफोड केला. एका पीडित महिलेची सुटका केली असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. लॉजमालकासह तिघे पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
सनराईज लॉजवर पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधून महिलांना पैशांचे आमिष दाखवून बोलावले जात होते. त्यानंतर त्यांचे फोटो काढून ते व्हॉटस्ॲपद्वारे ग्राहकांना पाठवले जायचे. ग्राहकांकडून मोठी रक्कम उकळून हा हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आणि उघडपणे चालवला जात असल्याची खात्रीशीर प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून सागर प्रभाकर कांबळे (२८, रा. मिणचे बुद्रुक, ता. भुदरगड) आणि कमलेश कृष्णा पाटील (३०, रा. हेळेवाडी, ता. राधानगरी) यांना अटक केली. लॉजमालक शहाजी एकनाथ वैद्य ऊर्फ सागर पाटील (रा. हेदवडे, ता. भुदरगड), सुहास निचिते (रा. सोळांकूर, ता. राधानगरी), विक्रम दिनकर कांबळे (रा. कासारवाडा, ता. राधानगरी) यांचा शोध सुरू आहे.
बनावट ग्राहक पाठवून रचला सापळा; खात्री होताच टाकला छापा
या रॅकेटचे उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी गुप्तपणे चक्रे फिरवली. पोलिसांनी आधी एक ‘बनावट ग्राहक’ (डमी कस्टमर) या लॉजवर पाठवला. त्या बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या सेक्स रॅकेटची खात्रीशीर माहिती मिळताच, पथकाने छापा टाकला आणि एका पीडितेची सुटका केली. घटनास्थळावरून सागर प्रभाकर कांबळे (वय २८, रा. मिणचे बुद्रुक, ता. भुदरगड) आणि कमलेश कृष्णा पाटील (३०, रा. हेळेवाडी, ता. राधानगरी) याला रंगेहात अटक केली. मात्र, मुख्य सूत्रधार शहाजी एकनाथ वैद्य ऊर्फ सागर पाटील, सुहास निचीते आणि विक्रम दिनकर कांबळे हे तिघे जण पोलिसांची चाहुल लागताच पसार झाले. दरम्यान, मुख्य आरोपी शहाजी एकनाथ वैद्य ऊर्फ सागर पाटील याला पोलिसांनी नंतर ताब्यात घेतले.
याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. ही कौतुकास्पद व धडक कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, विभागीय पोलिस अधीक्षक आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस उपनिरीक्षक सुहास पवार व त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
व्हॉटस्ॲप ग्रुपवरून जाळे
‘सागर पाटील फ्रेंड सर्कल’ या नावाने एक व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपच्या माध्यमातूनच मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवणे, दर ठरवणे आणि ऑनलाईन डील करून हा हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय चालवला जात होता. घटनास्थळी पोलिसांनी लॉजवर टाकलेल्या छाप्यादरम्यान ६,९०० रुपये रोख रोकड, चार महागडे मोबाईल फोन, ७२ निरोध पाकिटे, लॉजचे रजिस्टर आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.