

शिरोली पुलाची : येथील यादववाडी भागात सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या खोलीत हाय प्रोफाईल सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी शुक्रवारी (दि.25) छापा टाकला. यामध्ये दहशतवाद विरोधी पथक व शिरोली पोलिसांच्या संयुक्त कार्यवाहीत दोन पीडित बांगलादेशी महिलांसह दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कल्लेश चंद्रकांत खेकरे (वय २५, रा. लोहार गल्ली शिरोली) व बाबू बाळू पवार (वय २०, रा.कोडोली पन्हाळा) या दोघांनी यादव वाडी येथील सिद्धी विनायक अपार्टमेंट मध्ये दोन खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांनी दोन बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायासाठी वास्तव्यास ठेवून त्यांच्याकडून अनैतिक व्यापार सुरू केला होता.
ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी शाखेचे उपनिरीक्षक सुनील कवळेकर यांनी या ठिकाणी छापा टाकून खेकरे व पवार या दोघांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून दोन लाख तीस हजार चा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या डायरीत आणखीन पाच महिलांचा नावे असल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्याची नोंद शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात शनिवारी झाली आहे.