

कोल्हापूर : दसरा चौक - स्टेशन रोडवरील मध्यवर्ती व्हीनस कॉर्नर येथील हॉटेल व्हीनस लॉजिंगवर चालणार्या हायप्रोफाईल वेश्या अड्ड्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने सोमवारी दुपारी पर्दाफाश केला. पथकाने शरीरविक्रीसाठी आलेल्या दोन महिलांची सुटका केली. व्यवस्थापक जयसिंग मधुकर खोत (26, रा. कुंभारवाडी, ता. शाहूवाडी) याला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत 9 हजार 250 रुपयांची रोकड, निरोध पाकिटे, मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आला. आर्थिक मजबुरीचा फायदा घेत संशयित खोत याने शरीरविक्रयासाठी स्वत: लॉजवर बोलावून घेतल्याची कबुली पीडित महिलांनी दिली आहे. सुटका झालेल्या महिला उत्तर प्रदेश व रायगड जिल्ह्यातील असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. व्हीनस चौक येथील व्हीनस हॉटेल, लॉजिंगमध्ये वेश्या अड्डा चालविला जात असल्याच्या परिसरातील नागरिकांच्या तक्रारी होत्या. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाला कारवाईचे आदेश दिले. निरीक्षक कळमकर, सहाय्यक निरीक्षक स्वाती यादवसह पथकाने बोगस गिर्हाईक पाठवून खात्री पटल्यावर सोमवारी दुपारी लॉजवर छापा टाकला.
कारवाईत दोन पीडिता आढळून आल्या. महिलांसह व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पिडीतांकडे सखोल चौकशी करण्यात आली. लॉजवर येणार्या प्रत्येक गिर्हाईकांकडून तीन हजार रुपये घेण्यात येत होते. त्यापैकी 1500 रुपये व्यवस्थापक स्वत:कडे घेत, उर्वरित रकमेतून 500 रुपये खोली भाडे वजा करून एक हजार रुपये पीडितेच्या हातावर ठेवत होता असे स्पष्ट झाले. रात्री उशिरा व्यवस्थापकाविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यवर्ती व्हीनस चौकातील लॉजवर उघडपणे चालणार्या हायप्रोफाईल वेश्या अड्ड्याविरोधात परिसरातील नागरिकांतून संतापाच्या प्रतिक्रिया असतानाही स्थानिक पोलिस यंत्रणेकडून कारवाई होत नव्हती. माध्यमांनीही याप्रकारावर प्रकाश टाकला होता. तथापि काही कच्च्या दुव्यांना हाताशी धरून भरचौकात वेश्या अड्डा सुरू होता. जिल्हा प्रशासनाने लॉजिंगचा व्यवसाय परवाना निलंबित करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांतून होत आहे.