High Blood Pressure Risk | राज्यातील गावागावांत वाढतोय हाय बीपीचा धोका!

२४.२ टक्के ग्रामीण महिला; तर २६.५ टक्के ग्रामीण पुरुष उच्च रक्तदाबाने त्रस्त
High Blood Pressure Risk |
High Blood Pressure Risk | राज्यातील गावागावांत वाढतोय हाय बीपीचा धोका!
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : हाय बीपी, शुगर हे शहरातल्या लोकांचे आजार; गावातल्या माणसाला कसला बीपी? अशी अनेकांची समजूत होती. मात्र, बदलती जीवनशैली, वाढता ताण, कमी होणारे शारीरिक श्रम आणि अयोग्य आहार यामुळे उच्च रक्तदाबाने ग्रामीण महाराष्ट्रालाही विळखा घातला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील तब्बल २४.२ टक्के ग्रामीण महिला आणि २६.५ टक्के ग्रामीण पुरुष उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत किंवा रक्तदाब नियंत्रणासाठी औषधे घेत आहेत.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण केवळ १.८ टक्के, तर पुरुषांमध्ये केवळ ३.५ टक्क्यांचा फरक आहे. त्यामुळे उच्च रक्तदाबाचे संकट आता शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण महाराष्ट्रातही वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे. शहरी भागात २६ टक्के महिला आणि ३० टक्के पुरुष उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. त्यामुळे शहरांइतकीच ही समस्या ग्रामीण भागातही गंभीर बनत आहे.

सायलेंट किलरचा ग्रामीण भागाला चकवा

उच्च रक्तदाब हा 'सायलंट किलर' म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणे न दिसल्याने अनेकांना त्याची कल्पनाही नसते. मात्र त्यातून हृदयविकार, पक्षाघात, मूत्रपिंड विकार आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नियमित रक्तदाब तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि तणाव नियंत्रण यावर भर देण्याची गरज आहे.

यामुळे वाढतोय धोका!

ग्रामीण भागातील बदलती जीवनशैली, वाढते लठ्ठपण, शारीरिक श्रमाचे कमी झालेले प्रमाण, तंबाखूचे सेवन, वाढता मानसिक ताण आणि अयोग्य आहार यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे.

राज्यातील उच्च रक्तदाबाची स्थिती

ग्रामीण भागातील महिला : २४.२ टक्के

शहरी भागातील महिला : २६.० टक्के

ग्रामीण भागातील पुरुष : २६.५ टक्के

शहरी भागातील पुरुष : ३०.० टक्के

महिलांमध्ये एकूण उच्च रक्तदाब : २४.९ टक्के

पुरुषांमध्ये एकूण उच्च रक्तदाब : २७.७ टक्के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news