

कोल्हापूर : २०१३ मध्ये रमणमळा परिसरात भरदिवसा गोळीबार करून हेमंत बाबासो गायकवाड (वय २९, रा. रमणमळा) याचा खून केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी पिता-पुत्रांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राजेंद्र आनंदा सावंत (वय ६३), अभिजित राजेंद्र सावंत (३२), धैर्यशील राजेंद्र सावंत (३६ तिघेही रा. विचारेमाळ) अशी त्यांची नावे आहेत.
हेमंत गायकवाड याच्यावर सावंत पिता-पुत्रांनी गोळीबार केला होता. यात डोक्यात गोळी लागल्याने हेमंत जागीच मृत झाला होता तर शशिकांत जखमी झाला होता. शाहूपुरी पोलिसांनी अभिजित सावंत, धैर्यशील सावंत यांना अटक केली होती. फरार झालेल्या राजेंद्र सावंतला लॉकडाऊन काळात अटक झाली होती. या तिघांवर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील सुजाता इंगळे यांचा युक्तिवाद, बॅलेस्टिक रिपोर्ट, तांत्रिक पुरावे, ११ साक्षीदारांचे जबाब ग्राह्य मानून न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
किरकोळ कारणातून सावंत पिता-पुत्रांनी हेमंत गायकवाडवर गोळीबार करून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल चार पिस्तूल ताब्यात घेतले. ९ एमएमच्या खासगी पिस्तूलमधून गायकवाडवर गोळीबार केल्याचे फॉरेन्सिककडून स्पष्ट झाले. तीन राऊंडपैकी एक गोळी हेमंतच्या डोक्यात, दुसऱ्या गोळीचा नेम चुकला तर तिसरी गोळी शशिकांतला घासून गेली होती.
हेमंत गायकवाड, अभिजित व धैर्यशील सावंत या तिघांमध्ये रमणमळा परिसरात वर्चस्ववादावरून किरकोळ वाद होता. हेमंत व अभिजित यांच्यामध्ये नेहमीच खटके उडत होते. यातूनच गोळीबार केला. गोळीबारानंतर तिघेही पिता-पुत्र मोटारीतून पसार झाले. १५ दिवसानंतर दोघांना अटक केली. राजेंद्र सावंतने मुंबई उच्च न्यायालयातून मेडिकल ग्राऊंडवर अंतरिम जामिन मिळवला. १३ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागून सावंत पिता-पुत्रांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
चार पिस्तूल जप्त
पोलिसांनी तपासादरम्यान चार पिस्तूल जप्त केले. ओरोस (सिंधुदुर्ग) येथील कार्यालयातून तीन तर सावंतचे एक खासगी पिस्तूल चारही फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. फॉरेन्सिकच्या अहवालानुसार सावंतने खासगी पिस्तूलमधून गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले.
अनुकंपावर झाला भरती ...
अनुकंपा तत्त्वावर राजेंद्र उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबल म्हणून १९८८ मध्ये हजर झाला. २००१ मध्ये तो उपनिरीक्षक झाला. त्यानंतर शिरोली, रंकाळावेस कार्यालय, ओरोस (जि. सिंधुदुर्ग) येथे काम केले. घटना घडली त्यावेळी तो सिंधुदुर्ग येथे कार्यरत होता व कोल्हापूरचाही अतिरिक्त पदभार त्याच्याकडे होता.
तीन राऊंड फायर
राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक राजेंद्र सावंतने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी हेमंतच्या डोक्यात, एक हवेत, एक शशिकांतला लागली होती. गोळीबारानंतर तिघेही मोटारीतून पसार झाले होते. पोलिसांनी अभिजित व धैर्यशील यांना अटक केली. मात्र राजेंद्र पसार होता. त्याने उच्च न्यायालयातून अंतरिम जामिन मिळवला होता.