

सरवडे : हेळेवाडी (ता. राधानगरी) येथील उज्वला विनायक पाटील (वय ५५ ) या बायोगॅसच्या आउटलेटमधील शेण हलवण्यासाठी गेल्या असता पाय घसरून आउटलेटमध्ये पडल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. उज्वला पाटील या हेळेवाडी येथील अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची राधानगरी पोलीसांत नोंद करण्यात आली आहे.
हेळेवाडी येथील उज्वला विनायक पाटील या आपल्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बायोगॅस आउटलेटमधील शेण घट्ट झाले असल्याने ते हलवण्यासाठी गेल्या होत्या, त्यांचा पाय घसरून त्या बायोगॅसच्या आउटलेटमध्ये पडल्या. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून सोळांकुर इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. उज्वला पाटील अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून गेले अनेक वर्ष काम पाहत होत्या. नेहमी हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभावाच्या अंगणवाडी सेविकेच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मयत उज्वला पाटील यांचा पुतण्या विलास पाटील याने राधानगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. मुलगा महेश विनायक पाटील हा हेळेवाडी गावचा पोलीसपाटील म्हणून काम पाहतो, मृत उज्वला यांच्या मागे दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.