

कोल्हापूर : मान्सूनच्या दमदार एंट्रीनंतर कोल्हापुरात बुधवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. शहरात बुधवारी दुपारी जोरधारा बरसल्यानंतर रात्रीपर्यंत अधूनमधून हलक्या सरींचा शिडकावा सुरू होता. जिल्ह्यातील अनेक भागांतही पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासांत गगनबावडा (१२८ मि.मी.) व आंबा (९४ मि.मी.) सह तुळशी, कासारी, कुंभी, पाटगाव, कोदे धरण क्षेत्रातही अतिवृष्टी झाली. दरम्यान, हवामान विभागाने कोल्हापूरला रविवार (दि. २८) पर्यंत पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. यामुळे पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
शहरात मध्यरात्री पावसाच्या जोरदार सरी झाल्या. यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली. दुपारपर्यंत अधूनमधून मध्यम सरी बरसत होत्या. दुपारी काही काळ जोरदार सरी झाल्या. शहरातील अनेक चौक व सखल भाग जलमय झाले. लक्ष्मीपुरी येथील आईसाहेब महाराज पुतळा परिसरातील पुस्तक दुकान गल्लीत दोन फुटांहून अधिक पाणी साचले. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली.
सरासरी २४ मि.मी. पाऊस कोसळला
जिल्ह्यातील १२ तालुक्यांत गेल्या २४ तासांत २८७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून सरासरी २३.९६ मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०५ मि.मी. पाऊस झाला. शाहूवाडीमध्ये ४९.३, पन्हाळा २६.१, राधानगरी १८.८, आजरा १४.८, करवीर १२, चंदगड १२, कागल ११.८, गडहिंग्लज १०.५, हातकणंगले ६.३ आणि शिरोळमध्ये ३.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.
‘या’ गावांत जोरदार बरसला
सरुड, मलकापूर, राधानगरी, गारगोटी, कोडोली, कळे, कोतोली, बाजारभोगाव, भेडसगाव, बांबवडे, करंजफेण, कसबा वाळवे, हळदी आणि सिद्धनेर्ली या गावांमध्ये २० मि.मी.हून अधिक पाऊस झाला. राधानगरी, वारणा, दूधगंगा, कडवी, चिकोत्रा, चित्री आणि जंगमहट्टी धरण क्षेत्रातही जोरदार सरी कोसळल्याने जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होत आहे.