

कोल्हापूर : कोल्हापुरात रविवारी सायंकाळनंतर धुवाँधार पाऊस कोसळला. जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर होता, तर काही ठिकाणी तुरळक वृष्टी झाली. पावसामुळे शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जात असून नाचणी, भुईमूग, तीळ, सूर्यफुलाला फटका बसला आहे. गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच रोहिणीचा पेरा चुकला आहे. अद्याप राजाराम, रुई, इचलकरंजी, यवलूज व शिरोळ हे बंधारे पाण्याखाली आहेत. हवामान विभागाने कोल्हापूरला गुरुवार (दि. 29) पर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामुळे पुढील चार दिवस पावसाचेच राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर आहे. या पावसाने पेरण्या लांबणार आहेत. गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच रोहिणीचा पेरा चुकला आहे. यामुळे तयार झालेली भुईमूग, सूर्यफूल, तीळ आणि नाचणी पिके शेतातच कुजली असून उसाची भरणी खोळंबली आहे. मे महिन्यात होणार्या रोहिणीच्या धूळवाफ पेरण्या यंदा प्रथमच झाल्या नसल्याचे शाहूवाडी तालुक्यातील चित्र आहे.
गगनबावड्यात दमदार पाऊस सुरू आहे. मे महिन्यातच वर्षा पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गगनबावड्यात येत आहेत. सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली असून या पावसाने लखमापूर येथील कुंभी प्रकल्पात पाण्याचा साठा वाढला आहे. मात्र मका, भुईमूग, सूर्यफुलाचे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जाण्याच धोका आहे.
भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर असून भुईमूग, सूर्यफूल ही पिके पूर्णपणे कुजून गेली आहेत. ही पिके काढणीच्या टप्प्यात असताना आलेल्या पावसाने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात रविवारी पुन्हा पावसाचा जोर पहायला मिळाला. गेल्या 24 तासांत कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक पावासाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 14.1 मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. त्यानतंर भुदरगड 8.9, चंदगड 6.7, राधानगरी 6.1, शाहूवाडी 4.3, आजरा 3.5, कागल 2.9, हातकणंगले 2.7, पन्हाळा 2.2, करवीर 2.3, शिरोळ 1.6, गडहिंग्लज 1.2 मि.मी पावसाची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत वारणा, तुळशी, पाटगाव, जांबरे धरण क्षेत्रात पावसाचा जोर होता. मात्र गेल्या 8 तासांत पावसाचा जोर ओसरला आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंत राधानगरी धरण क्षेत्रात 12 मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर तुळशी 5, वारणा 3, दूधगंगा 10, कासारी 4, कडवी 1, कुंभी 14, पाटगाव 16, चिकोत्रा 8, चिंत्री 1, जंगमहट्टी 5, घटप्रभा 5, जांबरे 8, आंबोहोळ 3 मि.मी. पावसाची नोंद झाली.