

कोल्हापूर : सलग तिसर्या दिवशी, मंगळवारी रात्री वळवाने शहरातील काही भागाला झोडपले. काही भागात, काही काळ धुवाँधार पाऊस झाला तर काही परिसरात मात्र, हलक्या सरी बरसल्या. पुढील चार दिवस शनिवारपर्यंत जिल्ह्यात वळीव होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सासणे मैदानजवळ झाडाची मोठी फांदी पडून विद्युत वाहिन्या तुटल्या. यामुळे त्या परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.
मंगळवारी सकाळपासून हवेत उष्मा जाणवत होता. दुपारी उन्हाचा तडाखा अधिक होता. दुपारनंतर वाढत्या उष्म्याने पाऊस होईल, अशीच शक्यता होती. मात्र, सायंकाळपर्यंत पावसाने हुलकावणी दिली. रात्री साडेनऊ नंतर वातावरण ढगाळ होत गेले. पावणे दहानंतर जोरदार वारेही सुटले. यानंतर सव्वा दहा वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली. शहराच्या मध्यवर्ती परिसरात वळीव कोसळला. यामुळे रात्री घराबाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली. शहरातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. दक्षिणेकडील अनेक परिसरात पाऊस झाला नाही. काही भागात रात्री पावणे अकरानंतर पावसाच्या हलक्या सरी झाल्या. दिवसभरात शहरात 34.8 अंश इतक्या कमाल तापमानाची तर 23.8 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. पाऊस झाल्यानंतर रात्री हवेत काहींसा गारवा निर्माण झाला होता.
हातकणंगले : वादळी वार्यासह वळव्याच्या पावसाने हातकणंगले, आळते, मजले, नरंदे, बिरदेव वाडी व परिसरास झोडपून काढले. वडगाव रोडवरील नरंदे घाटात मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली. अन्य ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने अनेक भागात वीज खंडित झाला होता.
लाटवडे : येथे सायंकाळी चारनंतर वळीव पावसाने झोडपले. उरूस आणि पाऊस हे समीकरण वर्षांनुवर्ष चालत आले असून काल झालेला नरसिंह यात्रेतील भंडारा महाप्रसाद यानिमित्ताने मात्र कधीही आजपर्यंत पाऊस पडला नाही .
खोची : अनेक दिवस हुलकावणी देणार्या वळीव पावसाने खोचीसह परिसरात दमदार हजेरी लावली. जिरवणी स्वरूपात पाऊस पडल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
व्हनाळी : केंबळी, बेलवळे (ता. कागल) परिसरात मंगळवार रात्री साडेनऊच्या दरम्यान सुमारे अर्धातास वळीव पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या आठवड्यातील हा दुसरा पाऊस पडल्याने माळ रानातील ऊस पिकाबरोबरच भात शेतीची मशागत करण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.