

कोल्हापूर : जिल्ह्याच्या अनेक भागांत रविवारी दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम होता. तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने शिवारात चिखल झाला असून शेतीकामांवर पाणी फेरले आहे. अनेक ठिकाणी जनावरांच्या चार्याचीही अडचण झाली आहे.
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यात सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतली होती; परंतु सायंकाळनंतर पुन्हा सुरुवात केल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले असून खरिपाच्या पेरण्या कशा करायच्या, असा प्रश्न आहे.
निगवे खालसा : भुईमूग, सूर्यफूल, तीळ आणि नाचणीसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाने पिके शेतातच भिजून गेली. सूर्यफूल पिकांना कोंब फुटले आहेत.
गगनबावडा : तालुक्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. यंदाच्या उन्हाळी सुट्टीत आलेल्या पर्यटकांना वर्षा पर्यटनाचा अनुभव मिळत आहे. ऊस भरणी व चारा साठवणीची कामे अपूर्ण राहिली आहेत.
इचलकरंजी : शहर व परिसरात दुपारनंतर संततधार सुरूच होती. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पंचगंगेच्या पातळीतही वाढ होत आहे. नदीतील बंधारा पाण्याखाली गेला असून पहिल्या घाटावर पाणी आले आहे.
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरासह तालुक्यात सायंकाळनंतर पावसाने जोर धरला. रविवारी आठवडा बाजार होता; मात्र पावसामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली. व्यापार्यांचीही निराशा झाली. छत्री, रेनकोट विक्रेत्यांची उलाढाल वाढली आहे.