

कोल्हापूर : गेल्या आठवडाभरापासून शहरात वळवाची हजेरी सुरू आहे. रविवारी तर सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली होती. दुपारी पुन्हा उन्हाचा तडाखा होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तासाच्या धुवाँधार पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. जिल्ह्यातील काही भागांतही पावसाने हजेरी लावली.
अचनाक आलेल्या पावसामुळे नारिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे सखल भागाला तळ्याचे स्वरूप आले होते. वादळी वार्यामुळे शहरात पाच ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, हवामान विभागाने कोल्हापूरला गुरुवारपर्यंत (दि. 22) ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामुळे येणार्या चार दिवसांत शहरासह जिल्ह्यात ढगांच्या गडगडासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोल्हापूरला रविवारी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. सकाळी सहा वाजल्यापासून शहराच्या काही भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. साडेदहा वाजेपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. यानंतर दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा आणि ढगाळ वातवरण असे चित्र होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास धुवाँधार सरी कोसळल्या.
सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. रविवार असल्याने पर्यटक व नागरिक मोठ्या संख्येने अंबाबाई मंदिर व रंकाळा परिसरात होते. पावासापासून बचावासाठी पर्यटकांसह नागरिकांची पळापळ सुरू होती. अर्धातासच जोरदार सरी कोसळल्याने सखल भागलात पाणीच पाणी झाले होते. रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका, संभाजीनगर, महाद्वार रोड, पार्वती टॉकीज, कोटितीर्थ, हुतात्मा पार्क, हॉकी स्टेडियम, जरगनगर, परिसरात सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यातूनच नागरिकांची ये - जा सुरू होती. दुचाकीस्वारांना या डबक्यांमधून जाताना कसरत करावी लागत होती.
गगनबावडा : गगनबावडा व परिसरात रविवारी सायंकाळी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. गगनबावडा येथे मान्सून पूर्व पावसाने चकवा दिला होता; मात्र मान्सूनपूर्व पावसाने गगनबावडा येथे दमदार हजेरी लावली. हा पाऊस शेतीसाठी पोषक असल्याने शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे. शेतकरी वर्ग सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे. सुमारे अर्धा तास पडलेल्या दमदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले.
कसबा बावडा : येथे सकाळी सात वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली. हा पाऊस सुमारे दीड तास सुरू होता. दिवसभर वातावरणात कमालीचा उकाडा राहिला. सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरण पुन्हा ढगाळ झाले. काहीवेळ ढगांचा गडगडाट झाला; पण पाऊस पडला नाही. वातावरणात मात्र उकाडा जाणवत होता.
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने चांगलाच दणका देत सुमारे दोन तास हजेरी लावली. गडहिंग्लजचा आठवडा बाजार असल्याने पाचच्या सुमारास आलेल्या पावसाने तो पूर्णपणे विस्कळीत झाला.
बराच काळ पाऊस आल्याने व्यापार्यांना साहित्य हलवणे अडचणीचे झाले. त्यातच पाण्याचे लोट रस्त्यावर आल्याने भाजीपाला व बाजाराचे साहित्य वाहून गेले. बाजारात भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बाजाराला आलेल्या लोकांना पावसामुळे दुकानाचे आडोसे शोधत जवळपास दोन तास वाट पाहावी लागली. विजेचा गडगडाट जोरदार होत होता. दोन तासांनी पूर्णपणे उघडीप झाली नव्हती. उशिरापर्यंत हलक्या सरी सुरूच होत्या.
कर्नाटक किनार्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. त्यामुळे सोमवार (दि. 19) ते रविवार (दि. 25) कोल्हापूरसह राज्यात मोठ्या पावसाचा अंदाज आहे. यामुळे हवामान विभागाने कोल्हापूरला रविवारपासून गुरुवारपर्यंत (दि.22) ऑरेंज अलर्ट दिला आहे. या कालावधीत कोल्हापूर शहरासह जिल्हा व घाटमाथ्यावर वादळ, विजांच्या कडकडाटात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच तासी 50 ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचीदेखील शक्यता आहे.
धुवाँधार पावसासह शहरात वादळी वारे वाहत होते. या वार्यामुळे इंद्रजित कॉलनी जाधववाडी, जीवबानाना पार्क, संभाजीनगर, अंबाई टँक, सूर्या हॉस्पिटल या परिसरात झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली.