

कोल्हापूर : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासून पारा 38 अंशांवर गेला असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्यामध्ये कडक उन्हाळा असल्याचा अंदाज हवामान खात्यानेदेखील वर्तविला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीनेही खबरदारीचे उपाय राबविण्यात येत आहेत. उष्माघात ही अत्यंत गंभीर परिस्थिती असून वेळेवर उपचार न मिळाल्यास ते प्राणघातक ठरू शकते.
उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेता बाजार, प्रमुख कार्यालये, बस स्टेंड, टॅक्सी स्टँड, रिक्षा स्टँड आदी सार्वजनिक ठिकाणी पुरेशी सावलीची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सोय करावी. उन्हाळ्यात घ्यावयाची काळजीसंदर्भात पोस्टर्स लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शरीराचे तापमान 104° F (40° C) पेक्षा जास्त होणे. घाम न येणे व त्वचा कोरडी राहणे. चक्कर येणे, थकवा व अत्यधिक डोकेदुखी, हृदयाचे ठोके जलद होणे, भान हरपणे, भ्रमिष्ट होणे, काही गंभीर प्रकरणांमध्ये अंगातील अवयव निकामी होऊ शकतात.
तहान लागली नसली, तरी अर्ध्या तासाने पाणी व द्रव पदार्थ घेत राहा. थंड जागेत राहा. शक्य असल्यास उन्हात जाणे टाळा.
हलके, सुती व पांढर्या रंगाचे कपडे वापरा. टोपी, गॉगल व छत्रीचा वापर करणे.
पेट्रोल पंप, गॅस पंप ठिकाणी मोबाईल वापरू नये तसेच वाहने सावलीत लावावीत.
प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
गरोदर स्त्रिया आणि आजारी असलेल्यांची अधिक काळजी घ्यावी.
अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, उन्हाचा झटका, चक्कर येणे ही उष्माघाताची लक्षणे दिसताच रुग्णाला तातडीने सावलीत ठेवा, अंगावर थंड पाणी शिंपडून ताप कमी करावा व तातडीने उपचारासाठी डॉक्टरांकडे न्यावे.
शेतकर्यांसाठी : गवताच्या गंजी, सुका चारा, वाळलेले गवत अशा ठिकाणांची वारंवार पाहणी करावी. उसाच्या शेतीमध्ये दुपारी चारनंतर पाणी सोडावे.
उन्हात अतिकष्टाची कामे करू नये.
मादक पेये, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये टाळावीत. शिळे अन्न खायचे टाळा.
गडद रंगाचे घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे.