

कोल्हापूर : बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, असंतुलित आहार आणि व्यसनांचा अतिरेक यामुळे जीवनशैली संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः कोरोनानंतर राज्यभर हृदयविकाराचा विळखा घट्ट झाला आहे. 2018 च्या तुलनेत हृदयरोगावरील उपचारांत व हृदयशस्त्रक्रियांच्या संख्येत गेल्या वर्षी दुप्पट वाढ झाली आहे. ही वाढलेली आकडेवारी हृदयविकाराचा वाढता धोका स्पष्ट करते. कोरोनानंतर हार्ट अॅटॅक, स्ट्रोकचा धोका दुपटीने वाढतो, असा निष्कर्ष अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधन अहवालात मांडण्यात आला आहे.
कोरोना संसर्गानंतर अनेक रुग्णांमध्ये हृदयाच्या पेशींमध्ये सूज, रक्तदाबातील चढउतार, रक्ताच्या गाठी निर्माण होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये हा धोका चारपट जास्त दिसल्याचे अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अहवालात म्हटले आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 2018-19 मध्ये 66 हजार 104 जणांवर शस्त्रक्रिया व उपचार महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत करण्यात आले. 2019-20 मध्ये 79 हजार 368 तर 2020-21 मध्ये 68 हजार 159 शस्त्रक्रिया व उपचार झाले होते. कोरोनाच्या साथीनंतर अर्थात 2022 पासून हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. गतवर्षी डिसेंबरपर्यंत 1 लाख 19 हजार 580 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या योजनेत या शस्त्रक्रियांचा समावेश केल्याने पूर्वी ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया करता येत नव्हत्या, त्यांनाही आता योजनेतून उपचार घेणे सहज सुलभ झाले आहे.