

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत जतन व संवर्धन कामातील त्रुटींबाबत आक्षेपांप्रकरणी बाजू मांडण्याबाबत बुधवारी (दि. ५) पुढील सुनावणी होणार आहे. दिवाणी न्यायालयाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक आणि जिल्हाधिकारी या प्रतिवादींना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. याबाबत सोमवारी कामकाज न झाल्याने बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत मिळाली आहे.
गजानन विश्वनाथ मुनिश्वर आणि शिवकुमार शिंदे यांनी मंदिरातील संवर्धनाच्या कामांमध्ये गंभीर त्रुटी झाल्याचा दावा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयासमोर केला आहे. तसेच, प्लेसेस ऑफ वरशिप १९९१ च्या कायद्याच्या अनुषंगाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी मंदिर ज्या स्वरूपात अस्तित्वात होते, त्या मूळ ऐतिहासिक अवस्थेचे जतन करत संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी दाव्यात करण्यात आली आहे. या प्रकरणात ॲड. नरेंद्र गांधी, ॲड. ओमकार गांधी आणि ॲड. प्रसन्न मालेकर यांनी काम पाहिले. पुढील सुनावणीत प्रतिवादींची भूमिका काय असणार आणि न्यायालय पुढे कोणते आदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.