

कोल्हापूर : शासनाच्या रमाई आवास घरकूल योजनेतील मंजूर निधी लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना हातकणंगले पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अविनाश सुतार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. बुधवारी उचगाव पुलाजवळ सापळा रचून ही कारवाई केली.
तक्रारदार यांच्या आईच्या नावे रमाई आवास घरकूल योजनेतून 1 लाख 50 हजार रुपये मंजूर झाले आहेत. मंजूर पैसे पाच टप्प्यांत लाभार्थ्यांना मिळतात. त्यातील तीन टप्पे तक्रारदारांच्या आईच्या बँक खात्यावर जमा झाले. उर्वरित दोन टप्प्यांत पैसे कधी जमा होणार, याची विचारणा करण्यासाठी तक्रारदार हातकणंगले पंचायत समितीत गेले होते. त्यावेळी रमाई आवास घरकूल योजनेचे काम पाहणारा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अविनाश सुतार याने दोन हप्ते जमा करण्यासाठी त्यांच्याकडे तेरा हजार रुपयांची मागणी केली. पैसे देत नाही तोपर्यंत हप्ते जमा होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर दहा हजारांवर तोडगा निघाला. तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने उचगाव पुलाजवळ सापळा रचून अभियंता अविनाश सुतार याला दहा हजारांची लाच घेताना अटक केली. याप्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे. सुतार याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली.