

कासारवाडी : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील वन क्षेत्रात करण्यात आलेल्या बेकायदेशीर रस्त्याच्या उत्खननप्रकरणी अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत मुख्य वनसंरक्षकांनी चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. दै. 'पुढारी'ने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर वन विभागाच्या वरिष्ठ स्तरावर हालचालींना वेग आला.
उप वनसंरक्षक, कोल्हापूर यांनी १० जुलै २०२६ रोजी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात वन क्षेत्रातील उत्खननाचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर मुख्य वनसंरक्षकांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी ४ सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, त्यांना १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
या समितीला घटनास्थळाचा पंचनामा करणे, संबंधितांचे जबाब नोंदवणे आणि वन क्षेत्राचे नुकसान करणाऱ्या जबाबदार व्यक्ती, तसेच यामध्ये दोषी आढळणारे वन अधिकारी व कर्मचारी यांची नावे शोधून गोपनीय अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वन जमिनीचे नुकसान करून नियमांना पायदळी तुडवणाऱ्यांवर आता वन कायद्यानुसार कठोर कारवाई होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कासारवाडी वन क्षेत्रात शेकडो वृक्षांची कत्तल करून बेकायदेशीर रस्ता तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेचे वृत्त दै. 'पुढारी'ने सविस्तरपणे प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यानंतर कोल्हापूर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली.