

कोल्हापूर : काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याचा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा राहतील, असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. तसेच गोकुळ, जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असून आमचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. जिल्हा बँकेत त्यांनी शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आ. सतेज पाटील भाजप नेत्यांच्या भेटीला जात असल्याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ यांनी आ. पाटील हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ते गोकुळची निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे निवडणूक लढताना उमेदवार, कार्यकर्ते यांना प्रोत्साहन, आत्मविश्वास देण्यासाठी नेत्यांना प्रयत्न करावे लागतात. त्यानुसार आ. पाटील प्रयत्न करत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच गोकुळमध्ये सत्ता आली तेव्हा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र होतो. तीन वर्षांची कट ऑफ डेट असल्याने या संस्था अगोदरच काढल्या होत्या. सुनावणीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्यच्या संस्था सर्वाधिक आहेत. या संस्था वाचविणे आमची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यादी तयार झाल्यानंतर जिल्हा बँकेचा निर्णय
‘गोकुळ’प्रमाणेच जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकही महायुती म्हणूनच लढणार आहे. यादी तयार झाल्यानंतर महायुतीचे सर्व नेते बैठक घेऊन निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
'शक्तिपीठ'बाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार
पालकमंत्री प्रकाश आबिटकर मला भेटणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही शक्तिपीठ महामार्गासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच साखर साठ्यावर केंद्राचे नियंत्रण राहिले नसल्याने दर वधारले आहेत; पण सध्या दर नियंत्रणात आले आहेत. शासनाने कारखान्यांकडील साखर साठ्यांची तपासणी करावी, दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही मंत्री मुश्रीफ यांनी केली.
महाडिक-पाटील एकत्र येत असतील, तर स्वागतच
भाजप-काँग्रेसमधील हालचाली पाहता गोकुळमध्ये महाडिक-पाटील विरुद्ध मंत्री मुश्रीफ असे चित्र तयार केले जात आहे का, यावर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी याबाबत मला काय माहीत नाही; पण महाडिक आणि पाटील एकत्र येत असतील, तर स्वागतच असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.